मलेरियाचा खात्मा करणार ‘आर 21’ लस? | पुढारी

मलेरियाचा खात्मा करणार ‘आर 21’ लस?

ऑक्सफर्ड : तीन वर्षांपूर्वीपर्यंत मलेरियाच्या परजीवीविरुद्ध लस विकसित झालेली नव्हती. आता मलेरियाविरुद्ध दोन लसी विकसित झालेल्या आहेत. त्यापैकी एक आहे. ‘आरटीएस-एस’ आणि दुसरी आहे ‘आर21’. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक आणि ‘आर21’ चे मुख्य संशोधक अ‍ॅड्रियन हिल यांनी सांगितले की मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याचा काळ हा मोठा व महत्त्वपूर्ण आहे. या काळात मलेरियाचा खात्मा होऊ शकेल.

मलेरिया सुमारे तीन कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे, ज्यावेळी माणूसही विकसित झालेला नव्हता. पुरातन काळापासून असलेल्या म्हणजेच ‘प्रोटोझुआ’ या परजीवीपासून हा रोग होतो. तो विषाणूही नाही व जीवाणूही नाही. हा परजीवी सामान्य विषाणूपेक्षा आकाराने हजारो पट मोठा असतो. जनुकांची तुलना केल्यावर त्याचे स्वरुप समजू शकते. ‘कोव्हिड-19’ ला कारणीभूत ठरणार्‍या ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूमध्ये सुमारे बारा जनुके असतात. त्यांच्या तुलनेत मलेरियाच्या परजीवीमध्ये अधिक म्हणजेच 5 हजार जनुके असतात. याशिवाय मलेरियाचा परजीवी चार जीवनचक्रांमधून जातो.

संक्रामक रोगजनकांसह तो अधिकाधिक विक्राळ स्वरूप घेतो. वैद्यकीय संशोधक गेल्या शंभर वर्षांपासून मलेरियावर लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऑक्सफर्डमध्ये तीस वर्षांपासून संशोधन सुरू होते. मलेरियाची चारही जीवनचक्रे अतिशय वेगवेगळी असतात. त्यांचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या अँटीबॉडीजची आवश्यकता असते. अँटीबॉडी हे एक असे प्रोटीन आहे जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेला वेगवेगळ्या अँटीजेनविरुद्ध लढण्यासाठी सक्रिय करते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘आर21’ लसीला मंजुरी मिळाली. आता यामुळे मलेरियाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यावर आल्याचे मानले जात आहे.

Back to top button