चंद्राच्या काही ठिकाणांवर चीन ठोकू शकतो दावा | पुढारी

चंद्राच्या काही ठिकाणांवर चीन ठोकू शकतो दावा

वॉशिंग्टन : चीनचे विस्तारवादाचे धोरण जगाला काही नवे नाही. मात्र, आता चीन्यांचा डोळा चंद्रावरही आहे! चंद्राच्या काही भागांवर चीन आपला दावा ठोकू शकतो असा दावा ‘नासा’ने केला आहे. सध्या चीनचा अंतराळात स्वतःचा असा एक गुपचूप सैन्य कार्यक्रम सुरू आहे, असे ‘नासा’च्या प्रमुखांनी म्हटले आहे.

‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसद सदस्यांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चीनने विशेषतः गेल्या दहा वर्षांच्या काळात अंतराळ क्षेत्रामध्ये गोपनीयरीत्या मोठी प्रगती केली आहे. त्यांचा हा कार्यक्रम संशोधनात्मक किंवा नागरी नसून तो सैन्य अभियानाचा भाग असल्याचा आम्हाला संशय आहे. वास्तवात आपण एका रेसमध्येच उतरलेलो आहोत. याबाबत अमेरिकेने सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेल्सन यांनी 2025 साठी ‘नासा’च्या बजेटशी संबंधात विनियोग समितीसमोर साक्ष देत असताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चीनच्या आधी अमेरिकेला चंद्रावर पुन्हा एकदा उतरावे लागेल. जर चीनचे अंतराळवीर चांद्रभूमीवर आपल्या आधी गेले, तर ते तेथील जमिनीवर दावा ठोकून संबंधित भूभाग आमचा आहे, असा दावा करू शकतात! चीनने सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या धर्तीवर स्वतःचे एक अंतराळ स्थानक निर्माण केलेले असून, तिथे चिनी अंतराळवीर जाऊन वेगवेगळे प्रयोगही करीत आहेत.

Back to top button