हजार वर्षांनंतर रोमच्या ‘बाथ्स ऑफ कॅराकल्ला’ मध्ये पाणी | पुढारी

हजार वर्षांनंतर रोमच्या ‘बाथ्स ऑफ कॅराकल्ला’ मध्ये पाणी

रोम :`तब्बल एक हजार वर्षानंतर आता प्राचीन रोम नगरीतील प्रसिद्ध बाथ्स ऑफ कॅराकल्ला मध्ये पाणी वाहू लागले आहे. लोकांसाठी हा आश्चर्यकारक आणि स्वकतार्ह बदल झाला. त्याचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी साजरा केला. याठिकाणी बॅले नृत्याचेही आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नव्याने बांधण्यात आलेल्या पूलवर झाला.

सम्राट सेप्टीमियस सेवेरस याच्या कारकिर्दीत इसवी सन 212 मध्ये या स्थळाची उभारणी सुरू झाली होती. ती सेप्टीमियसचा उत्तराधिकारी कॅराकल्ला याच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेली. अतिशय व्यापक जागेत बांधलेल्या या स्थळाची भव्यता आजही पाहायला मिळते. काळाच्या ओघात हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळही बनले. शिवाय याठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जात असते.

अलिकडेच स्थानिक प्रशासनाने या ऐतिहासिक स्नानगृहामध्ये पुन्हा पाणी सोडण्याची योजना आखली. त्यासाठी एका उथळ अशा स्विमिंग पूलची निर्मिती करण्यात आली. त्याचे डिझाईन हॅन्स पिअर व पावलो बोर्नेल्लो या आर्किटेक्टनी केले. हा आयताकृती पूल 42 मीटर लांब आणि 32 मीटर रुंदीचा आहे. तो केवळ दहा सेंटीमीटर खोलीचा आहे.

Back to top button