नॉस्त्रेदेमसचे ‘हे’ भविष्य ठरणार खरे? | पुढारी

नॉस्त्रेदेमसचे ‘हे’ भविष्य ठरणार खरे?

लंडन : सोळाव्या शतकातील फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्त्रेदेमसच्या भाकितांबाबत दरवर्षी चर्चा होत असते. चालू वर्षाबाबत त्याने जी भाकिते करून ठेवलेली आहेत, त्याचीही चर्चा होत असते. आता इंग्लंडच्या राजघराण्याबाबतचे त्याचे भाकीत खरे ठरत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या हे राजघराणे गंभीर आजारांचा सामना करीत आहे. खुद्द राजे चार्ल्स तृतीय तसेच त्यांची थोरली सून केट मिडल्टन हे कर्करोगाने ग्रस्त आहेत. अशा वेळी एका राजाच्या सत्ता त्यागासंदर्भात आणि अनपेक्षित उत्तराधिकारी समोर येण्यासंदर्भात नॉस्त्रेदेमसने केलेल्या भाकिताची चर्चा होत आहे. हा संदर्भ किंग चार्ल्स तृतीय व त्यांचे अमेरिकेत वास्तव्यास असलेले धाकटे चिरंजीव प्रिन्स हॅरी यांच्याशी जोडला जात आहे!

नॉस्त्रेदेमस यांनी आपल्या पुस्तकात गूढ भाषेत काही काव्यमय रचना करून ठेवलेल्या आहेत. त्यांनाच वेगवेगळ्या शतकातील वर्षांबाबतचे भाकीत मानले जाते. या पुस्तकात म्हटले आहे की, सध्याच्या वर्षात एका राजाला पायउतार केले जाईल आणि नंतर एक अशी व्यक्ती राज्य करील, ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसेल! किंग चार्ल्स यांना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करीत असताना त्यांना कर्करोग जडला असल्याचे निदान झाले होते. ते आपल्या ढासळत्या प्रकृतीमुळे सिंहासन सोडतील अशी एक अटकळ आहे.

मात्र प्रिन्स हॅरीबाबत अद्याप काहीही सांगता येऊ शकत नाही. त्याने राजघराण्यातील अनेक अधिकार सोडून पत्नी व दोन अपत्यांसह अमेरिकेत संसार थाटला आहे. तो वेळोवेळी राजघराण्यावर पुस्तक, मुलाखती या माध्यमातून टीकाही करीत असतो. त्याला राजेशाहीत फारसा रस आहे, असेही दिसत नाही. तरीही तो थोरला भाऊ विल्यमच्या जागी ब्रिटनच्या राजसिंहासनावर येऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नॉस्त्रेदेमसचे भाकीत कुणाबाबत खरे ठरते याबाबत लोकांना उत्सुकता आहे!

Back to top button