अमेरिकन ब्लॉगरला बंगळुरातील नव्या सुसज्ज टर्मिनलची भुरळ | पुढारी

अमेरिकन ब्लॉगरला बंगळुरातील नव्या सुसज्ज टर्मिनलची भुरळ

बंगळूर : अमेरिकन ब्लॉगर कार्ल रॉकने बंगळूरमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर केला आहे. कार्ल रॉकने या व्हिडीओत अनावरणासाठी सज्ज असलेल्या ‘टर्मिनल 2’ वर फोकस ठेवला आहे. या टर्मिनलमधील आकर्षक डिझाईन व अत्युच्च दर्जाच्या सेवासुविधा लक्षवेधी ठरत असून, पर्यटक व वास्तूप्रेमींमध्येही याबद्दल औत्सुक्य दिसून आले आहे.

कार्ल रॉक आपल्या प्रवास वर्णनावर आधारित ब्लॉगसाठी विशेष ओळखले जातात. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन ते विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. ‘टर्मिनल 2’मधील प्रतिभाशाली वास्तूशिल्प व सौंदर्यावर प्रत्येकजण प्रभावित होईल. हे जगभरातील सर्वात सुंदर विमानतळ असेल का, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बंगळुरातील टर्मिनल येथील प्रवेशद्वार तर आहेच; पण पायाभूत सेवासुविधा कशा कौशल्यपूर्ण व पर्यावरणाला अनुकूल असू शकतात, याचा उत्तम नमुना येथे दिसून येतो, याचाही यात उल्लेख आहे. कार्ल रॉकने यावेळी आपल्या पोस्टमध्ये या टर्मिनल्सचे डिझाईन तयार करणार्‍या स्किडमोड, ओव्हिंग्स अँड मेरिल एलएलपीचा विशेष उल्लेख केला आहे. कार्ल रॉकने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही कालावधीतच त्याला लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते.

Back to top button