सर्वात महाग साबण | पुढारी

सर्वात महाग साबण

त्रिपोली : एखादा साबण जास्तीत जास्त किती महाग असू शकतो? काय वाटतं तुम्हाला… 100 रुपये? 500 रुपये? अगदी फारफार तर सेलिब्रिटी किंवा श्रीमंतांसाठी खास तयार केलेला हजार रुपये. परंतु, कदाचित तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण एक साबण असादेखील आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. एका साबणाच्या किमतीत तुम्ही हिरे किंवा सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे गेल्या बर्‍याच काळापासून एकच कुटुंब या साबणाची निर्मिती करत आहे. तर मग पाहूया या खास साबणामध्ये असं आहे तरी काय?

‘बशर हसन अ‍ॅण्ड सन्स’ ही कंपनी लेबनानच्या त्रिपोली येथे या साबणाची निर्मिती करते. या साबणाचं नाव ‘द खान अल’ साबण असं आहे. एका लहानशा फॅक्टरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या साबणाची निर्मिती केली जात आहे. ही कंपनी लग्जरी साबणांसोबतच स्किनकेअर प्रोडक्टदेखील तयार करते. यांच्या एका साबणाची किंमत कमीत कमी 2 लाख रुपये इतकी असते. या साबणात जराही भेसळ केली जात नाही. वापरण्यात आलेले सर्व पदार्थ शुद्ध स्वरुपातील असतात. त्यामुळेच या साबणांची किंमत लाखो रुपये आहे.

या साबणात 17 ग्रॅम सोनं असतं. काही ग्रॅम डायमंड पावडर, थोडे शुद्ध ऑलिव्ह ऑईल, सेंद्रिय मध, खजूर आणि इतर गोष्टी वापरल्या जातात. या साबणाचे बहुतेक ग्राहक हे संयुक्त अरब अमीरातीच्या दुबई शहरात आहेत. तिथल्या काही दुकानांमध्ये या खास साबणाचा सप्लाय केला जातो. हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटी या साबणाचा वापर करतात अशी चर्चा आहे. मात्र, एवढे महाग साबण वापरणं सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही हे मात्र खरं!

Back to top button