वेगवेगळी कामे करणारे ‘एआय’युक्त रोबो | पुढारी

वेगवेगळी कामे करणारे ‘एआय’युक्त रोबो

लंडन : रोबो, नॅनो टेक्नॉलॉजी, ड्रोन, थ्री-डी प्रिंटर आणि एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या सर्व गोष्टी नव्या युगाची वैशिष्ट्ये दाखवणारीच आहेत. ‘एआय’ आधारित रोबोंची आता मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून हे रोबो अतिशय कुशलतेने वेगवेगळी कामे करू शकतात. आता नॉर्वेमधील ‘वन एक्स’ नावाच्या रोबोटिक्स कंपनीने अशा काही रोबोंची निर्मिती केली आहे. हे रोबो कसे काम करतात याचा एक सायलंट व्हिडीओही कंपनीने शेअर केला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू हाताळणारे रोबो दिसून येतात.

कंपनीचे डझनभर ‘इव्हीइ’ रोबो एका मोठ्या प्रयोगशाळेतील चाचणीवेळी वेगवेगळी कामे करीत असताना या व्हिडीओमध्ये दिसते. तिथे ऑफिस आणि घरातील लिव्हिंग रूमसारख्या जागा निर्माण करण्यात आल्या होत्या. या ‘इव्हीइ’ रोबोंमध्ये नव्या गोष्टी शिकण्याची तसेच स्वयंचलितपणे वेगवेगळे काम करण्याची क्षमता आहे. केवळ एखादे फुटेज पाहूनही ते नवे काम शिकू शकतात. असे रोबो भविष्यात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करीत असताना दिसू शकतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशिन लर्निंग मॉडेलच्या समूहाच्या सहाय्याने म्हणजेच ‘न्यूरल नेटवर्क’च्या सहाय्याने काम करण्याचे प्रशिक्षण या रोबोंना देण्यात आले आहे. हे नेटवर्क अगदी मानवी मेंदूसारखेच काम करतो किंवा तशा कामाची नक्कल करतो. एकच व्हिजन-बेस्ड न्यूरल नेटवर्क या सर्व रोबोंचे वर्तन नियंत्रित करते. वेगवेगळ्या मशिन्समधून प्रतिमा गोळा करून व त्यांचे विश्लेषण करून या रोबोंना कोणतीही हालचाल किंवा कृत्य करण्याआधी योग्य कमांड पाठवली जाते. त्यामुळे हे रोबो योग्य पद्धतीने सर्व कार्य करतात.

संबंधित बातम्या
Back to top button