अमेरिकेत वाढत आहेत शतायुषी लोक | पुढारी

अमेरिकेत वाढत आहेत शतायुषी लोक

वॉशिंग्टन : वेदांमध्ये ‘जीवेत शरदः शतम्’ (आम्ही शंभर शरद ऋतू पाहावेत) अशी प्रार्थना आहे. अथर्ववेदात सूर्याकडे ही प्रार्थना केलेली आढळते. त्यावरूनच आपण इतरांना शुभेच्छा देत असताना ‘जीवेत शरदः शतम्’ (तुम्ही शंभर शरद ऋतू पाहावेत) असे म्हणत असतो. मात्र, सध्याच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या जीवनात आरोग्याची हेळसांड होत असल्याने व अन्यही विविध कारणांमुळे शतायुषी लोकांचे प्रमाण कमी झालेले आहे. अर्थात, जपानसारख्या काही देशांमध्ये शतायुषी लोक मोठ्या संख्येने आढळतात. आता अमेरिकेतही शतायुषी लोकांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः, तेथे शतायुषी महिलांची संख्या वाढली आहे.

येत्या तीस वर्षांमध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या अमेरिकन लोकांची संख्या चौपट होण्याची शक्यता आहे. 1970 पासून तिथे शतायुषी लोकांची संख्या अंदाजे दहा वर्षांनी दुप्पट होत आहे. स्वीडनच्या करोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी विविध बायोमार्कर्सचे परीक्षण करून ही माहिती समोर आणली आहे. संशोधकांना असे आढळले की, जे शंभर वर्षे जगले त्यांच्यामध्ये वयाच्या साठाव्या वर्षी ग्लुकोज, क्रिएटिनीन आणि यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होती. यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण सर्वात कमी असलेली व्यक्ती शंभर वर्षे जगण्याची शक्यता अधिक होती.

शंभरी पूर्ण केलेल्या एकूण अमेरिकन नागरिकांची संख्या सध्या केवळ 0.03 टक्के आहे. 2054 पर्यंत ही संख्या 0.1 टक्क्याने आणखी वाढण्याची शक्यता आहे. जगात सुमारे 7,22,000 लोक शतायुषी आहेत. 2024 मध्ये सर्वाधिक शतायुषी लोक जपान, अमेरिका, चीन, भारत आणि थायलंडमध्ये आहेत. जपानमध्ये प्रत्येक दहा हजार लोकांमागे अंदाजे बारा लोक शतायुषी आहेत. थायलंडमध्ये दहा हजार लोकांमध्ये पाच, तर अमेरिकेत तीन लोक शंभरी पार केलेले आहेत. चीन आणि भारतामध्ये शंभरी पार केलेले लोक दहा हजारांमध्ये एकपेक्षाही कमी आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button