भारतीय मसाल्यांची बातच न्यारी; का आहेत इथले मसाले जगप्रसिद्ध? | पुढारी

भारतीय मसाल्यांची बातच न्यारी; का आहेत इथले मसाले जगप्रसिद्ध?

भारतीय खाद्यपदार्थांची चव, त्यांचा सुगंध म्हणजे, स्वर्गसुख असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं संपूर्ण श्रेय जातं भारतातील मसाल्यांना. गेल्या अनेक शतकांपासून मसाल्यांचं माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. भारतीय मसाल्यांची बातच न्यारी, त्यांची चव आणि सुगंध सर्वांनाच भुरळ घालते. याच मसाल्यांमुळे भारताची खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातही अनेक ठिकाणे आहेत, जिथे मसाले खास आहेत. त्यांच्यामध्ये असेच एक ठिकाण आहे, ज्याला देशातील ‘मसाल्यांचं माहेरघर’ म्हणून ओळखलं जातं. भारतीय मसाल्यांबाबतची ही रंजक माहिती…

जगातील 109 पैकी 75 मसाले भारतातील : कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या यादीत जगभरातील तब्बल 109 मसाल्यांचा समावेश होता. त्यापैकी 75 मसाले हे भारताचे योगदान आहे. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की, भारतात किती मसाले तयार होतात आणि इथले मसाले जगप्रसिद्ध का आहेत.

मसाल्यांचा राजा ‘हे’ शहर : केरळमधील कोझिकोड ‘मसाल्यांचा राजा’ म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते आणि एवढंच नाही तर हे मसाले विदेशातही पाठवले जातात. इथे काळी मिरी, तमालपत्री, वेलची, लवंग, दालचिनी, जायफळ आणि व्हेनिला पॉड यासारख्या मसाल्यांचे उत्पादन घेतले जाते.

आंध्र प्रदेशातील मिरची : भारतात आंध्र प्रदेश राज्य मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेते. इथे अनेक प्रकारची लाल मिरची मिळते, ज्यामध्ये अतिशय तिखट मिरचीपासून कमी तिखट मिरच्यांचेही उत्पादन येथे घेतले जाते.

धने : मध्य प्रदेशात सर्वाधिक धन्यांचे उत्पादन होते. मसाल्यांच्या पदार्थांमध्ये आवर्जुन समावेश केले जाणारे धनेही फार महत्त्वाचे आहेत. मध्य प्रदेशातील मसालेही जगभरात प्रसिद्ध आहेत. विशेषतः इथे धन्यांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जातं.

भारतीय मसाल्यांची भुरळ : भारतीय मसाल्यांचा वारसा शतकानुशतके जुना आहे, म्हणूनच मुघल आणि इंग्रजांनाही भारतीय मसाल्यांचे वेड होते. असे म्हटले जाते की, मसाल्यांचे खरे मूळ भारतात होते आणि इथून लोक परदेशात मसाले घेऊन जात असत. एके काळी भारतातून आयात केलेल्या काळ्या मिरीला इंग्लंडमधील उच्चभ्रू समाजात ‘ब्लॅक गोल्ड’ म्हणून मानाचे स्थान होते!

Back to top button