शुक्राणूंची संख्या घटण्यामागे मोबाईलचेही कारण! | पुढारी

शुक्राणूंची संख्या घटण्यामागे मोबाईलचेही कारण!

जिनिव्हा : सध्या मोबाईल किंवा सेलफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. सर्व कामे एका क्लिकवर होत असल्याने मोबाईल फोनचा अतिवापर वाढला आहे. पण यासोबतच याचे दुष्परिणाम देखील तितकेच वाढले आहेत. मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यवरही दुष्परिणाम होतोय. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. आता या यादीत आणखी एक समस्येची नोंद झाली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत घट होऊ शकते असे आढळले आहे.

गेल्या 50 वर्षांत जागतिक स्तरावर पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी यामागे प्रदूषण आणि मनुष्य वापरत असलेल्या अन्न आणि पाण्यात असलेल्या विषारी घटकांचे कारण असल्याचे म्हटले आहे. पण आता पुरुषांमधील घटत्या शुक्राणूंच्या संख्येमागे आणखी एक कारण असल्याचे म्हटले जात आहे. हे कारण आहे मोबाईल फोनचा वाढता वापर. नवीन संशोधनानुसार मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पुरुषांच्या शरीरातील शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.

जिनिव्हा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात 2005 ते 2018 दरम्यान लष्करी भरती केंद्रांवर 18 ते 22 वर्षे वयोगटातील 2,886 पुरुषांचा डेटा तपासण्यात आला. जे पुरुष दिवसातून 20 पेक्षा जास्त वेळा त्यांचा फोन वापरतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी होते (44.5 दशलक्ष प्रति मिलीलिटर), तर जे पुरुष फोन कमी वापरला त्यांच्या शुक्राणूंची संख्या तुलनेने जास्त होती (56.5 दशलक्ष प्रति मिलीलिटर) असे या अभ्यासात आढळून आले आहे.

दिवसातून कमी फोन वापरणार्‍यांच्या तुलनेत दिवसातून जास्त वेळा फोन वापरणार्‍यांच्या शुक्राणूंच्या संख्येत 21 टक्के घट झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता, संख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जर एखाद्या पुरुषाच्या शुक्राणूंची एकाग्रता 15 दशलक्ष प्रति मिलीलिटरपेक्षा कमी असेल, तर त्याला गर्भधारणेसाठी लागणारे शुक्राणू निर्माण होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. जर शुक्राणूंची संख्या 40 दशलक्ष प्रति मिलीलिटरपेक्षा कमी झाली तर गर्भधारणेची शक्यता कमी होते.

Back to top button