चक्क शेतात ‘उगवतात’ खुर्च्या! | पुढारी

चक्क शेतात ‘उगवतात’ खुर्च्या!

लंडन : शेतात कधी खुर्च्यांचे पीक आलेले तुम्ही पाहिले आहे का? या दुनियेत काहीही घडू शकते. आता शेतात चक्क खुर्च्याही उगवू लागल्या आहेत. एक माणूस असे खुर्च्यांचे पीक घेतो. त्याचे हे कौशल्य पाहून लोक थक्क होत असतात.

सर्वसाधारणपणे आपण शेतात धान्य, फळे, फुले पाहात असतो. मात्र हा माणूस शेतात फर्निचर उगवतो. त्याच्या या खुर्च्यांना बरीच मागणीही आहे. या माणसाचे नाव आहे गॅविन मनरो. तो इंग्लंडच्या डर्बिशायर डिल्सचा रहिवासी आहे. एरवी लाकूड कापून त्यापासून खुर्ची बनवली जात असते. मात्र इथे थेट झाडांनाच खुर्चीसारखा आकार देत वाढवले जाते व पीक ‘कापणी’ला आले की ही खुर्ची कापून नेली जाते. यासाठी ‘वीलो’ नावाच्या झाडांचा तो वापर करतो. त्याच्या फांद्या अतिशय लवचिक असतात व हव्या तशा वाकवता येतात.

अशाच प्रकारे ओक, ऐश आणि सिकामोरसारख्या मजबूत झाडांपासूनही तो खुर्च्या बनवतो. या झाडांना खुर्च्यांचा आकार देण्यासाठी तो लोखंडी फ्रेमचा वापर करतो. या फ्रेम किंवा साच्यामध्ये झाडांना फिट करून त्यांना वाढू दिले जाते. प्रत्येक पाच वर्षांनी या खुर्च्यांची ‘कापणी’ केली जाते. अर्थातच या खुर्च्या महाग आहेत. अशी एक खुर्ची सहा-सात लाख रुपयांना मिळते. त्यासाठी सात वर्षे आधीच ऑर्डर द्यावी लागते. या कामात गॅविनला त्याची पत्नी एलिसही मदत करीत असते.

Back to top button