

रायगड ः पुढारी वृत्तसेवा : मतदारसंघात केलेली कोट्यवधी रुपयांची कामे आणि पाच विधानसभा आमदारांचे असलेले पाठबळ या जोरावर रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयाची नोंद केली जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
जनतेच्या रोजच्या सुख-दुःखात समरस होताना धर्मनिरपेक्ष विचार घेऊन या मतदारसंघात गेली 40 वर्षे काम करत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात जेव्हा जेव्हा अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यावेळी पहिल्यांदा जनतेला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेशी भावनिक नाते जुळले आहे. त्यामुळे ही जनता नक्कीच निवडून देईल अशी खात्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना नेते रामदास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुश्ताक अंतुले, पेण विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अदिती तटकरे, महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले आणि दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम यांच्या विकासकामांनाही जनता पाठिंबा देत असल्याने विजयाची खात्री आहे, असेही तटकरे म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर काँक्रीटीकरणासाठी 700 कोटी रुपये मंजूर करुन घेतले, अनेक मदरसे, मस्जिद यांच्या सुशोभीकरणाला व कब्रस्थानांच्या संरक्षण भिंती मंजूर करून घेतल्या. कुणबी समाजासाठी मुलुंड मुंबई येथे विद्यार्थी वसतिगृहाला निधी मिळवून दिला. अलिबाग येथे पासपोर्ट कार्यालय सुरू केले. कोकणातील अनेक जलद रेल्वे गाड्यांचे रोहा, माणगाव आणि खेड येथे थांबे मंजूर केले. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांना भरीव आर्थिक मदत मंजूर केली आहे, असेही तटकरे म्हणाले.
महिनाभर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. याअगोदरही मतदारसंघात वाडीवस्त्यांवर जात समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीच पाठीशी उभ्या राहिलेल्या जनतेने असेच प्रेम ठेवावे, असे आवाहनही तटकरे यांनी केले.
हेही वाचा