Shakira Statue : कोलंबियात शकिराचा २१ फूट उंचीचा पुतळा | पुढारी

Shakira Statue : कोलंबियात शकिराचा २१ फूट उंचीचा पुतळा

न्यूयॉर्क : प्रसिद्ध गायिका व नर्तकी शकिरा हिला तिच्या कोलंबियामधील जन्मगावाने मोठाच सन्मान दिला आहे. बॅरेंक्विला नावाच्या या शहरातील पार्कमध्ये तिचा तब्बल 21 फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा उभा करण्यात आला आहे. नृत्याच्या पोजमधील शकिराच्या या अत्यंत सुंदर पुतळ्याचे अनावरण तिच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिचे कुटुंबीय भावूक झाले होते.

ग्रॅमी पुरस्कार विजेती शकिराचे जगभर चाहते आहेत. ती केवळ एक गायिका नसून नर्तकी, गीतकार आणि विशेषतः लहान मुलांसाठी काम करणारी एक समाजसेविकाही आहे. आता तिला तिच्या होमटाऊनने या पुतळ्याच्या रूपाने मानवंदना दिली आहे. या पुतळ्यामध्ये ती तिच्या सिग्नेचर बेली डान्स पोजमध्ये दिसून येते. या पुतळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ आता समोर आले असून तिच्या चाहत्यांनी याबाबत आनंदही व्यक्त केला आहे.

वयाच्या केवळ चौथ्या वर्षीच आपले पहिले गाणे लिहिणार्‍या शकिराने आता जगप्रसिद्धी मिळवलेली आहे. तिचा आवाज, नृत्य आणि सौंदर्य या सर्वांचे जगभर चाहते आहेत. ‘वाका वाका’ सारख्या गाण्याला तर अवघ्या जगाने डोक्यावर घेतले होते. तिला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत; पण ज्या गावात ती जन्मली व वाढली तेथील या उंच पुतळ्याचे एक वेगळे महत्त्व आहे. 46 वर्षांच्या शकिराचा हा पुतळा बॅरेंक्विलामध्ये नदीच्या काठी आहे. स्वतः शकिरानेही त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

Back to top button