‘हे’ आहे जगातील पहिले घड्याळ? | पुढारी

‘हे’ आहे जगातील पहिले घड्याळ?

लंडन : जुन्या काळात वेळ समजण्यासाठी वाळूची घड्याळे वापरली जात असत. लोक सूर्यप्रकाशावरूनही वेळेचा अंदाज घेत. मात्र पहिले यांत्रिक घड्याळ कधी बनवले हे माहिती आहे का? सोबतच्या छायाचित्रात दिसणारी वस्तू म्हणजेच जगातील पहिले घड्याळ आहे असा दावा केला जातो. जगातील पहिले घड्याळ पीटर हॅनलॅन यांनी बनवल्याचे मानले जाते व त्यांनीच बनवलेले एक घड्याळ काही वर्षांपूर्वी सापडले आहे. या घड्याळाला ‘पोमँडर’ असे नाव देण्यात आले आहे.

जगातील जुन्या घड्याळाचे मूल्यांकन करत असलेल्या एका कमिटीने सांगितले की, सफरचंदाच्या आकाराचे हे पोमॅडर घड्याळ जगातील सर्वात जुने घड्याळ आहे. या कमिटीमध्ये हरमॅन ग्रोएब, डॉ. पीटर मिलिकिसन यासारखे संशोधक आहेत. हे घड्याळ जगासमोर कसे आले हे पाहणेही रंजक आहे.

घड्याळ तयार करणार्‍या एका तरुणाने लंडनच्या एका जुन्या वस्तूंच्या मार्केटमधून दहा पौंडात एक बॉक्स विकत घेतला होता. त्याच बॉक्समध्ये हे घड्याळ मिळाले. त्याने 2002 मध्ये हे घड्याळ विकले आणि ते घेणार्‍याने आणखी कुणाला तरी विकले. पुढे जाऊन एका संशोधकाने ते खरेदी केले आणि त्याने या घड्याळाची जगाला ओळख करून दिली. हे घड्याळ सोने आणि तांबे या धातूंंपासून बनवले आहे. सन 1505 मध्ये ते तयार करण्यात आले होते. ते पीटर हॅनलॅन यांचेच असल्याचे सांगितले जाते. या घड्याळाची किंमत 30 ते 50 दशलक्ष युरो असल्याचे सांगितले जाते.

Back to top button