ब्रिटनमध्ये सापडले 2100 वर्षांपूर्वीचे नाणे | पुढारी

ब्रिटनमध्ये सापडले 2100 वर्षांपूर्वीचे नाणे

लंडन : ब्रिटनमध्ये रोमनपूर्व काळातील एका सत्ताधीशाच्या राज्यातील दुर्मीळ असे सोन्याचे नाणे सापडले आहे. प्राचीन ब्रिटनमधील या सत्ताधीशाबाबत अतिशय कमी माहिती इतिहासाला ज्ञात आहे. आपण देवाइतकेच शक्तिशाली आहोत, असा या सत्ताधीशाचा दावा होता. एका मेटल डिटेक्टोरिस्टला हे नाणे सापडले असून त्याचा आता लिलावही करण्यात आला आहे.

याचवर्षी मार्च महिन्यात हॅम्पशायर कौंटीत हे दुर्मीळ नाणे सापडले होते. त्याचा स्पिंक ऑक्शन हाऊसकडून 20,400 पौंड (24,720 डॉलर्सना) लिलाव करण्यात आला. या नाण्यावर लॅटिन अक्षरांमध्ये एक नाव कोरलेले आहे. ‘इसुनेर्टोस’ असे हे नाव आहे. त्याचा अर्थ ‘इसोस किंवा इसुस या देवाइतकाच सामर्थ्यशाली’ असा होतो. त्या काळात स्थानिक परिसरात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणार्‍या गौलिश या भाषेतील हे नाव आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील इन्स्टिट्यूट ऑफ आर्कियोलॉजीमधील जॉन सिल्स यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनीच या नाण्याचा लिलाव होण्यापूर्वी त्याचा अभ्यास केला होता. हे नाणे इसवी सन पूर्व 50 ते इसवी सनपूर्व 30 या काळातील आहे. इसवी सनपूर्व 55 ते इसवी सनपूर्व 54 या काळात ज्युलियस सीझरने ब्रिटनवर दुसर्‍यांदा आक्रमण केले, तो हा काळ आहे. सीझरच्या या आक्रमणामध्ये त्याला ब्रिटनवर कायमस्वरूपी रोमन नियंत्रण निर्माण करण्यात अपयश आले होते. इसवी सन 43 मध्ये सम्राट क्लौडिअसच्या काळात ब्रिटनवर दीर्घकाळासाठी रोमन सत्ता आली.

Back to top button