Mysterious Bigfoot : अमेरिकेत दिसला आठ फुटांचा गूढ ‘बिग फूट’? | पुढारी

Mysterious Bigfoot : अमेरिकेत दिसला आठ फुटांचा गूढ ‘बिग फूट’?

कोलोरॅडो : यती, वनमानव या नावाने केसाळ, धिप्पाड अशा Mysterious Bigfoot मानवाकृती गूढ प्राण्याची जगभर चर्चा होत असते. अमेरिकेत त्यांना त्यांच्या भल्या मोठ्या पायांच्या कथित ठशांमुळे ‘बिग फूट’ म्हटले जाते. अनेक लोक अशा ‘बिग फूट’ला पाहिल्याचे दावेही करीत असतात. आता अमेरिकेतील कोलोरॅडो येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक रहस्यमय व्यक्ती दिसत असल्याचा दावा केला जात आहे, ज्याची लांबी 8 फुटांपेक्षा जास्त आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करून ट्रेनने परतणार्‍या एका जोडप्याने हा व्हिडीओ आपल्या कॅमेर्‍यात कैद केला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महाकाय मानव Mysterious Bigfoot भरदिवसा डोंगराच्या बाजूला भटकताना दिसत आहे. शॅनन आणि स्टेटस्न पार्कर ज्यांनी हा व्हिडीओ कॅप्चर केला, त्यांनी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. दोघेही लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करून परतत होते. शॅनन म्हणाले, आम्ही सेंटेनियल राज्याच्या अगदी नैऋत्येला डुरंगो आणि सिल्व्हर्टन दरम्यान एका नॅरो गेज रेल्वे मार्गावरून प्रवास करत होतो. तेव्हा आम्हाला काहीतरी हलत असल्याचा भास झाला. आम्ही आपल्या डोळ्यांनी एका अशा व्यक्तीला पाहिलं जो एखाद्या बिगफुटसारखा होता. त्याची उंची किमान 8 फूट असावी. शॅननने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. पार्कर म्हणाले, आम्ही काही वर्षांपूर्वी पहाडांवर स्नोशूइंग करायला गेलो होतो. तिथे आम्हाला बिगफूटच्या पावलांचे ठसे दिसले होते, ते स्नोशूजपेक्षा खूप मोठे होते. स्थानिक लोकांनी सांगितले की येथे बिगफूट दिसत असतात. पार्कर म्हणाले, आम्ही पाहिलेला माणूस शिकारीसारखा दिसत नव्हता. त्याच्याकडे कोणतेही हत्यार नव्हते. त्याचे केस खूप लांब होते. काही वर्षांपूर्वी मिसिसिपीच्या जंगलात असेच एक द़ृश्य कॅमेर्‍यात कैद झाले होते. 1800 पासून अमेरिकेत बिगफूट दिसत असल्याच्या बातम्या आहेत. पण शास्त्रज्ञांनी यावर कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही.

Back to top button