रोमँटिक शहर पॅरिसमध्ये ढेकणांनी मांडला उच्छाद! | पुढारी

रोमँटिक शहर पॅरिसमध्ये ढेकणांनी मांडला उच्छाद!

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसची ओळख एक ‘रोमँटिक’ शहर म्हणून आहे. फॅशनच्या दुनियेत मिरवणारे नखरेल, रंगेल पॅरिस आता निराळ्याच कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. या शहरात आधीच उंदरांचा सुळसुळाट होता. आता तिथे चक्क ढेकणांचाही सुळसुळाट झालेला आहे. सध्या पॅरिस फॅशन वीकसाठी जगभरातील अनेक लोक या शहरात आलेले आहेत आणि ते सोबत ही ढेकणंही कळत-नकळत घेऊन जातील व आपापल्या देशांमध्ये त्यांचा फैलाव करतील असे म्हटले जात आहे!

सोशल मीडियात पॅरिसमधील अनेक ठिकाणे ढेकणांनी कशी बुजबुजलेली आहेत याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. केवळ हॉटेलच्या खोल्यांमध्येच नव्हे तर कॅफे, थिएटर आणि सार्वजनिक बसमध्येही ढेकणांचा सुळसुळाट आहे. सध्या तिथे जगप्रसिद्ध पॅरिस फॅशन वीक सुरू आहे. वेगवेगळ्या देशांमधून अनेक लोक यासाठी शहरात आले आहेत. त्यांच्या साहित्यांमधून हे ढेकूणही नकळत जगभर ‘निर्यात’ केले जातील अशी शंका आहे.

पॅरिसमध्ये उंदरांचीही मोठीच समस्या आहे. हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक ‘उंदीरग्रस्त’ शहर आहे. 2020 मध्ये या शहरात सुमारे 40 लाख उंदीर असल्याचे स्पष्ट झाले होते. युरोपसारख्या खंडातील फ्रान्ससारख्या एका विकसित देशाची राजधानी असलेल्या पॅरिससारख्या जगप्रसिद्ध शहराची ही अवस्था आहे. ‘दुरून डोंगर साजरे’ हेच खरे!

Back to top button