महाकाय हिमनग धडकला पेंग्विनच्या अधिवासावर | पुढारी

महाकाय हिमनग धडकला पेंग्विनच्या अधिवासावर

वॉशिंग्टन : एक महाकाय हिमनग पेंग्विन पक्ष्यांचे अधिवास असलेल्या बेटाला धडकले आहे. तब्बल 72 किलोमीटर लांबीचा हा ‘डी-30 ए’ नावाचा हा हिमनग अंटार्क्टिकामधील प्रजनन करणार्‍या पेंग्विनचे महत्त्वाचे आश्रयस्थान असलेल्या ‘क्लेरेन्स’ बेटाला धडकला आहे. सुदैवाने त्यावेळी हे पक्षी आपल्या या घरात नव्हते.

हा हिमनग र्‍होड आयलंडच्या निम्म्या आकाराचा होता. अशाच एका धडकेतून दोन वर्षांपूर्वी या हिमनगाची निर्मिती झाली होती. हा हिमनग 72 किलोमीटर लांब आणि 20 किलोमीटर रुंदीचा होता. तो ‘डी-30’ नावाच्या हिमनगाचा सर्वात मोठा तुकडा होता. तो अंटार्क्टिकाच्या तटाजवळून हळूहळू पश्चिमेकडे सरकत होता. 2022 च्या अखेरीस त्याने अचानक आपला मार्ग बदलला आणि तो क्लेरेन्स बेटाच्या दिशेने वाहू लागला. हे साऊथ शेटलँड आयलंडस्पैकी सर्वात पूर्वेकडील बेट आहे. त्याचा पृष्ठभागाचा परिसर हा ‘डी-30 ए’ हिमनगापेक्षा दहा पटीने लहान आहे. हा हिमनग बेटाच्या दक्षिण किनारपट्टीवर आदळला. हे बेट ‘चिन्सट्रॅप पेंग्विन’ या प्रजातीच्या पेंग्विनचे प्रजननाचे ठिकाण आहे. दरवर्षी हिवाळ्यात या बेटावर पेंग्विनच्या एक लाख जोड्या प्रजननासाठी येत असतात. याठिकाणी ते अंडी घालून ती उबवतात व पिल्लांचा जन्म होतो. हिमनग धडकल्यामुळे त्यांच्या संख्येवर काही परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते.

Back to top button