मंगळावर धुळीचे रहस्यमय वादळ | पुढारी

मंगळावर धुळीचे रहस्यमय वादळ

वॉशिंग्टन : मंगळ मोहिमेतील 899 व्या दिवशी ‘नासा’ने मंगळावर घेतलेला एक व्हिडीओ रीलिज केला असून त्यात दोन किलोमीटर लांब व 200 फूट रुंद वादळाची नोंद झाली आहे. अवघ्या चार सेकंदांचा हा व्हिडीओ 21 फ—ेम्सच्या मदतीतून तयार केला गेला आहे. मंगळ ग्रहावर उष्ण वातावरण असताना रोव्हरने या वादळाचे द़ृश्य टिपले. नंतर हे वादळ विवराच्या पश्चिम रिमच्या दिशेने निघून गेले. या वादळाला धुळीचा सैतान असे नाव दिले गेले आहे.

बोल्डर कोलोराडोत स्पेस सायन्स इन्स्टिट्यूटचे प्लॅनेट सायंटिस्ट व सदस्य मार्क लेमन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘आम्ही डस्ट लेव्हलची वरील बाजू पाहू शकत नाही. पण त्याची सावली पडते, त्यावरून त्याच्या उंचीचा अंदाज लावता येतो. हे वादळ आमच्या मते, साधारणपणे 2 किलोमीटर लांब होते. मंगळ ग्रहावर अशा प्रकारचे वादळ येणे ही सर्वसाधारण बाब आहे. येथील हलके वातावरण आणि त्याचबरोबर जमीन व हवेच्या तापमानातील फरक अशा वादळांसाठी पूरक असतात. आता पृथ्वीवरील वादळाच्या तुलनेत मंगळवारी वादळ खूपच छोटे आणि कमकुवत असतात; पण तरीही ते ग्रहावर चारही बाजूने तुफान पसरवू शकतात’.

मंगळ ग्रहावरील हवामान व जलवायू अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी संशोधक याचा अभ्यास करत आले आहेत. पर्सिव्हरन्सच्या पथकाने या वादळाची लांबी, गती व आकार मोजण्यासाठी व्हिडीओवरील डेटाचा वापर केला. रोव्हरपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर थोरोफेयर रीज या जागेवर हे वादळ टिपले गेले. प्रतितास 19 किलोमीटर वेगाने ते पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत होते. संशोधकांनी त्याची सावली पाहून त्याचा अंदाज वर्तवला आहे. मंगळाच्या उत्तर गोलार्धात काही ठराविक महिन्यात अशी वादळे येथे येत असतात आणि पर्सिव्हरन्स रोव्हर याच ठिकाणी उपस्थित आहे. मात्र, ही वादळे नेमकी केव्हा व कुठे दिसून येतील, याचा अचूक अंदाज अभ्यासकांनाही वर्तवता येत नाही. त्यामुळे पर्सिव्हरन्स आणि त्याचा साथीदार ‘नासा’ मंगळ रोव्हर क्युरिऑसिटी सर्व दिशांनी लक्ष ठेवून असतात. डेटा वाचवण्यासाठी यावेळी कृष्णधवल छायाचित्रे टिपली जातात.

Back to top button