ब्रह्मांडात सक्रिय कृष्णविवरांची संख्या कमीच! | पुढारी

ब्रह्मांडात सक्रिय कृष्णविवरांची संख्या कमीच!

वॉशिंग्टन : प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी शक्तिशाली कृष्णविवर असते. आपली सौरमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे त्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेच्या मध्यभागीही एक मोठे व शक्तिशाली कृष्णविवर आहे. अशी अतिशय शक्तिशाली, महाकाय कृष्णविवरे कशी निर्माण होतात व त्यांचा कसा विकास होतो, याबाबत सातत्याने संशोधन सुरू असते. आता ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने केलेल्या नव्या निरीक्षणांवरून दिसून आले आहे की अशी सक्रिय कृष्णविवरे आधीच्या अनुमानापेक्षा ब्रह्मांडात कमीच आहेत!

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लहान वयाच्या ‘सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोल्स’चा विकास वेगाने होत असतो. ते आजुबाजूचे सर्व अवकाशीय घटक ‘गट्टम’ करीत असतात. आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेच्या केंद्रभागी असलेले कृष्णविवर मात्र आता शांत झालेले आहे. त्याचे सक्रिय असण्याचे दिवस कधीच मागे पडलेले आहेत.

बहुतांश महाकाय कृष्णविवरांची वाढ ही वास्तवात 7 ते 11 अब्ज वर्षांपूर्वीच्या काळातच झालेली आहे. वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असलेल्या अतिशय सक्रिय कृष्णविवरांचा ‘अल्ट्रा-पॉवरफूल’ अशा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने शोध घेण्यात आला. पृथ्वीपासून अब्जावधी प्रकाशवर्ष अंतरांवर असलेल्या सुमारे 400 आकाशगंगांचे निरीक्षण करण्यात आले. कन्सास युनिव्हर्सिटीच्या अ‍ॅलिसन किर्कपॅट्रिक यांनी सांगितले की सक्रिय अशा कृष्णविवरांची संख्या अनुमानापेक्षा कमीच आहे.

Back to top button