‘त्या’ दगडावरून उलगडणार सौरमालिकेच्या प्रारंभाचे रहस्य | पुढारी

‘त्या’ दगडावरून उलगडणार सौरमालिकेच्या प्रारंभाचे रहस्य

वॉशिंग्टन : मे 2020 मध्ये दक्षिण अल्जेरियातील सहारा वाळवंटाच्या ‘एर्ग चेच सँड सी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या वाळूच्या टेकड्यांवर हिरवट स्फटिकांनी युक्त असलेले काही अनोखे दगड सापडले होते. अभ्यासांती दिसून आले की हे दगड पृथ्वीवरील नसून ते बाह्य अंतराळातून आलेले आहेत. त्यामध्ये अब्जावधी वर्षांपूर्वीचे घटक सामावलेले असल्याचेही दिसून आले. या दगडांच्या अभ्यासामुळे आता सौरमालिकेच्या पहाटेच्या काळातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असे संशोधकांना वाटते.

हे सर्व दगड म्हणजे ‘एर्ग चेच 002’ या नावाच्या उल्केचे तुकडे आहेत. ती आतापर्यंतची सर्वात जुनी ज्वालामुखीय खडकाची उल्का असल्याचे स्पष्ट झाले. सध्या ज्यांचे अस्तित्व राहिलेले नाही अशा काही अतिशय जुन्या ग्रहांवरून ही उल्का आली असावी असे संशोधकांना वाटते. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ‘एर्ग चेच 002’ नावाच्या उल्केत शिसे आणि युरेनियमचे आयसोटोप्स असून ती 4.56556 अब्ज वर्षांपूर्वीची आहे.

सौरमालिकेच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या काळातील ही उल्का असल्याने त्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी ही उल्का उपयुक्त ठरू शकते. 4.567 अब्ज वर्षांपूर्वी काही वायू व धुळीच्या मोठ्या ढगांपासून आपल्या सौरमालिकेने आकार धारण केला. या ढगातील अनेक घटकांमध्ये अल्युमिनियमही होते जे दोन स्वरुपात आले. पहिले स्वरूप स्थिर असून ते मअल्युमिनियम-27’ हे होते तर दुसरे किरणोत्सर्गी असून ते ‘अल्युमिनियम-26’ हे होते. सौर मालिका कशी बनली व तिचा कसा विकास झाला हे जाणून घेण्यासाठी आता हे ‘अल्युमिनियम-26’ उपयुक्त ठरणार आहे.

Back to top button