अंतराळात मधाचाही होतो चेंडू! | पुढारी

अंतराळात मधाचाही होतो चेंडू!

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर सहा-सहा महिने राहून विविध वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. त्यांच्या तेथील जीवनाविषयी सर्वसामान्य लोकांना नेहमीच कुतूहल असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने तत्संबंधित बाबींविषयी तर अनेकांना कुतूहल असते. संयुक्त अरब अमिरातीमधील एक अंतराळवीर सध्या या स्थानकावर राहत आहे. तो तेथील जीवनाविषयीचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असतो. आता तिथे ब्रेडला मध लावून तो कसा खाल्ला जातो, या साध्या नाश्त्याचाही व्हिडीओ शेअर केला आहे. अंतराळात मधही चेंडूचे रूप कसे घेतो याची गंमत त्याने या व्हिडीओमधून दाखवली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओमध्ये हा अंतराळवीर मधासोबत ब्रेड खाताना दिसत आहे. यूएईमधून अंतराळात जाणार्‍या पहिल्या 2 अंतराळवीरांपैकी एक असलेला सुलतान अल-नियादी सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 6 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आहे. येथून त्याने हा व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो मधाची बाटली उघडतो आणि ब्रेडवर मध लावतो.

या दरम्यान, त्याने बाटली उलटी करण्याऐवजी ती सरळ उभी ठेवली, कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे मध खाली पडण्याच्या ऐवजी वरच्या दिशेने बाहेर पडते. ब्रेडला लावल्यानंतर मध एखाद्या चेंडूसारखा आकार घेते. संपूर्ण व्हिडीओमध्ये अनेक वेळा ब्रेड किंवा मधाची बाटली तिथेच सोडलेली आणि ती हवेत तरंगताना दिसत आहे. अल-नियादीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका यूझरने यावर कमेंट करत लिहिले – ब्रेडवर लावल्यानंतर मध बॉलचा आकार कसा घेतो हे खूप मनोरंजक आहे.

आणखी एक यूझर म्हणाला- हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला समजले की, मी माझे अन्न अंतराळात कुठेही सोडू शकतो, जे खूप मस्त आहे. आणखी एका यूझरने लिहिले – अंतराळातील अन्न खायला मला वर्षे लागतील. कारण मी सतत त्याच्याशी खेळत राहीन. याशिवाय अल-नियादीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यापैकी एकामध्ये तो स्पेस फार्मिंग दाखवत आहे आणि त्याच्याशी संबंधित माहितीही देताना दिसत आहे.

Back to top button