वर्षभर चालत जाणारे विचित्र झाड! | पुढारी

वर्षभर चालत जाणारे विचित्र झाड!

क्वेटो : जगभरात चित्रविचित्र झाडाच्या अनेक प्रजाती आढळतात. यातील काही झाडे लाजाळू असतात तर काही झाडे विशिष्ट प्रकारचे आवाजही काढतात. वाचून आश्चर्य वाटेल. पण, यातील एक झाड असेही आहे, जे वर्षभर चालत असते आणि हळूहळू आपल्या मूळ जागेपासून अगदी काही मीटर्सपर्यंत पुढे जाते!

हे विचित्र झाड इक्वेडोरमध्ये आढळून येते आणि त्याला ‘वॉकिंग पाम ट्री’ या नावानेही ओळखले जाते. सॉक्रेटिया एक्सॉर्झिया असे या झाडाचे शास्त्रीय नाव आहे. दक्षिण अमेरिकेतील दाट जंगलात अशा प्रकारची झाडे आढळून येतात. या झाडांचे सर्वाधिक प्रमाण इक्वेडोरची राजधानी क्वेटोपासून 100 किलोमीटर अंतरावर वसलेल्या सुमैका बायोस्फियर रिझर्व्हमध्ये आढळून येते.

रोज ही झाडे 2 सेंटीमीटरपर्यंत ‘चालू’ शकतात आणि वर्षभरात ते अगदी 20 मीटरपर्यंत पुढे जाऊ शकतात. आता ही झाडे माणसाप्रमाणे चालत नाहीत. पण, एक खास प्रक्रिया त्यांना चालणारे झाड बनवते. वास्तविक, या झाडाची मुळे खास स्वरूपाची असतात आणि नवी मुळे येताच हे झाड किंचित पुढे सरकते व हा प्रवास पुढे असाच सुरू राहतो. झाडाला येणारी नवी मुळे अधिक मजबूत जमीन शोधण्याच्या प्रयत्नात पुढे सरकतात, असे संशोधकांचे मत आहे. पण, एखादे झाड चालू शकते का, यावर या संशोधकात अनेक मतमतांतरे आहेत.

Back to top button