घरातच सापडली अनोखी गुहा! | पुढारी

घरातच सापडली अनोखी गुहा!

लंडन : कधी कधी आपल्याच घरात काय दडलंय याची अनेकांना कल्पना नसते. घरात ‘सिक्रेट रूम’ सापडण्यापासून ते चक्क विहीर सापडण्यापर्यंतच्या अनेक घटना पाश्चात्त्य जगतात घडलेल्या आहेत. आता असाच एक प्रकार ब्रिटनमधील नॉटिंघम येथे घडला आहे. तिथे एका तरुणीला तिच्या घराच्या खाली एक ‘सिक्रेट’ गुहा सापडली आहे. जवळपास 200 वर्षे प्राचीन असलेली ही गुहा पाहून तरुणीचा मोठा धक्का बसला आहे. घराचे काम सुरू असतानाच काही मजुरांच्या नजरेस ही गुहा पडली तेव्हाच या घटनेचा खुलासा झाला आहे. तरुणीच्या घराखाली सापडलेली गुहा ही सन 1800 च्या दशकातील असू शकते, असा दावा करण्यात येत आहे.

या तरुणीने घराखाली सापडलेल्या गुहेबाबत तिच्या मित्रांना व शिक्षकांना माहिती दिली. त्यानंतर सर्व एकत्र गुहेच्या आत नेमकं काय दडलंय याचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस गुहेचा वापर प्राचीन काळी घरातील सामान साठवण्यासाठी केला जात अशावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. घरात इमर्जन्सी लाईट लावण्याचे काम सुरू असताना मजुरांना या गुहेबाबत माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी घराच्या मालकांना याबाबत सांगितले. तरुणीने तिच्या मित्रांसह गुहेत जाण्यास तयार झाली.

त्यावेळी गुहेतील जमिनीवर एक पूर्ण मजला तयार केला गेलेला दिसला. तर, गुहेतील चार भिंतीमध्ये सामान ठेवण्यासाठी बेंच कापलेले दिसले. या बेंचवर अन्न व पेय साठवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा. स्टेफनी बेनेट ही तरुणी अलीकडेच या घरात शिफ्ट झाली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, ही गुहा 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद आहे. स्टेफनी हिने स्थानिक पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या गुहेची पाहणी केल्यानंतर जवळपास दोन दशकांपूर्वी या गुहेची बांधणी केली असावी, असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. ही गुहा एका घरातील तळघरासारखी आहे.

संबंधित बातम्या
Back to top button