कृष्णविवराकडून पृथ्वीच्या दिशेने ऊर्जेचा फवारा | पुढारी

कृष्णविवराकडून पृथ्वीच्या दिशेने ऊर्जेचा फवारा

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या एका मोहिमेत आढळून आले की एक शक्तिशाली कृष्णविवर थेट पृथ्वीच्या दिशेनेच अतिशय उच्च अशा ऊर्जेचा फवारा सोडत आहे. अर्थात यामुळे आताच घाबरून जाण्याची गरज नाही. याचे कारण म्हणजे ही अवकाशीय घटना सुरक्षित अंतरावर म्हणजे पृथ्वीपासून तब्बल 40 कोटी प्रकाशवर्ष अंतरावर घडत आहे.

कृष्णविवरांची आकर्षण शक्ती प्रचंड असते. अगदी प्रकाशकिरणही त्यांच्या तावडीतून सुटत नाहीत. अशी शक्तिशाली कृष्णविवरे त्यांच्या सभोवती फिरत असणार्‍या मॅटरच्या डिस्कलाही गिळंकृत करीत असतात. मात्र, जे मॅटर अशी कृष्णविवरे गट्टम करीत नाहीत त्यांना वेगाने त्यांच्या ध्रुवाच्या दिशेने उत्सर्जित करतात. अतिशय मोठ्या गतीने हे मॅटर जाऊन त्यांचा स्फोट होत असतो. त्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणातील ऊर्जा असलेले व तीव्र प्रकाशयुक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन होते.

काही वेळा जसे आता ‘नासा’च्या मोहिमेत आढळले, तसे थेट पृथ्वीच्या दिशेने त्यांचा फवारा उडतो. अशा घटनांना ‘ब्लेझर्स’ असे म्हटले जाते. या विशिष्ट ब्लेझरला ‘मार्कारियन 421’ असे नाव असून तो उर्सा मेज या तारकामंडळात आहे. ‘नासा’च्या ‘इमेजिंग एक्स-रे पॉलेरीमेट्री एक्सप्लोरर’ (आयएक्सपीई) च्या सहाय्याने ही घटना पाहण्यात आली.

Back to top button