दिव्यांग विद्यार्थ्याने बनवले अनोखे हेल्मेट | पुढारी

दिव्यांग विद्यार्थ्याने बनवले अनोखे हेल्मेट

लखनौ : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील बारावीत शिकणार्‍या एका दिव्यांग विद्यार्थ्याने अनोखे हेल्मेट बनवले आहे. हे हेल्मेट परिधान केल्याशिवाय बाईक स्टार्टच होणार नाही. तसेच बाईक चालवणार्‍या व्यक्तीकडून दारूचा वास आला तर बाईक सुरू होणार नाही, अशा पद्धतीचे हे हेल्मेट आहे. आपले वडील दुचाकी अपघातात जखमी झाल्यावर त्याला अशा पद्धतीचे हेल्मेट तयार करण्याची कल्पना सुचली.

या विद्यार्थ्याचे नाव आहे इंद्रेश कुमार. त्याने बनवलेले हेल्मेट रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी मदत करू शकते. हे हेल्मेट बाईकशी कनेक्ट केले की जोपर्यंत चालक हेल्मेट परिधान करीत नाही तोपर्यंत बाईक सुरू होत नाही. तसेच जर बाईक चालवणार्‍या व्यक्तीने दारू पिली असेल तर त्याचा गंध येताच बाईक सुरू होत नाही. त्यामुळे नशेत गाडी चालवल्याने होणारे अपघातही टाळता येऊ शकतील. इंद्रेश कुमार हा सोनभद्रच्या रॉबर्टसगंज ब्लॉकमधील मधुपूर गावातील रहिवासी आहे.

तो सोनभद्रच्या चुर्क येथील जय ज्योती इंटर कॉलेजमध्ये शिकतो. त्याच्या पायांमध्ये 50 टक्के दिव्यांगता आहे व त्यामुळे तो चालू शकत नाही. त्याने बनवलेल्या या हेल्मेटबाबत उत्तर प्रदेशचे परिवहनमंत्री दयाशंकर सिंह यांनी त्याला सन्मानित केले आहे. इंद्रेश कुमार सध्या आपल्या शोधाचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने सांगितले की दोन वर्षांपूर्वी त्याचे वडील दारू पिऊन बाईक चालवत होते व त्यावेळी अपघातात जखमी झाले. त्यावेळीच त्याच्या मनात अशा प्रकारचे हेल्मेट बनवण्याचा विचार आला होता.

Back to top button