चार लाख वर्षांपूर्वी मंगळाच्या हवामानात घडले मोठे बदल | पुढारी

चार लाख वर्षांपूर्वी मंगळाच्या हवामानात घडले मोठे बदल

वॉशिंग्टन : मंगळावरील हवामानात चार लाख वर्षांपूर्वी नाट्यमय बदल घडून आले होते. त्याचे पुरावे चीनच्या झुरोंग या मार्स रोव्हरने शोधले आहेत. मंगळावरील उटोपिया प्लॅनिटिया या भागातील टेकड्यांच्या अंधार्‍या, काळ्या कड्यांदरम्यान हे पुरावे शोधण्यात आले.

चीनच्या नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीमधील ली चुनलाई यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी या रोव्हरच्या उपकरणांचा संशोधनासाठी वापर केला. तसेच चीनच्या ‘तियानवेन-1’ या मार्स ऑर्बिटरच्या हाय-रिझोल्यूशन कॅमेर्‍यांमधून करण्यात आलेल्या निरीक्षणांचाही वापर करण्यात आला. मे 2021 मध्ये ‘झुरोंग’ हे रोव्हर मंगळावरील या वाळूच्या टेकड्यांजवळ उतरले होते. या टेकड्यांचे निरीक्षण करून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या टेकड्या लाखो वर्षांपासून चंद्रकोरीच्या आकारात उभ्या असून त्यांचे कडे अंधार्‍या भागात झाकलेले आहेत. या कड्यांना ‘ट्रान्सव्हर्स एओलियान रिजेस’ असे म्हटले जाते.

वाळूच्या मैदानात या टेकड्या निर्माण झालेल्या असल्या तरी वार्‍यामुळे निर्माण झालेल्या टेकड्यांपेक्षा वेगळ्या कोणात त्या उभ्या आहेत. मंगळावरील वार्‍यांच्या दिशांचाही अ‍ॅटमॉस्फिरिक सर्क्युलेशन मॉडेल्सच्या सहाय्याने अभ्यास करण्यात आला. मात्र, या रचना नेमक्या कशा बनल्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. झुरोंगच्या निरीक्षणातून दिसून आले की या रचना त्यांच्या पृष्ठभागावरील काळसर सामग्रीपेक्षा त्याखाली असलेल्या व अधिक उजळ सामग्रीने बनलेल्या आहेत.

‘तियानवेन-1’ ने मंगळाच्या पृष्ठभागावरील एकूण 2262 उजळ रंगाच्या टेकड्या पाहिल्या आहेत. या टेकड्यांची निर्मिती 2.1 दशलक्ष ते 4 लाख वर्षांपूर्वी झाली, असा अंदाज आहे. त्याचा अर्थ या काळ्या टेकड्याही चार लाख वर्षांपूर्वी बनल्या होत्या. याच काळात मंगळावरील मोठे हिमयुग सुरू होऊन संपुष्टात आले होते. याच हिमयुगाच्या अखेरच्या काळात काळ्या टेकड्यांचा कोन बदलला असावा, असे संशोधकांना वाटते. ज्या कोनातून मंगळ ग्रह फिरतो, त्यामध्ये बदल झाल्याने हे हिमयुग सुरू झाले होते.

Back to top button