शार्कसारखे दात, ज्याला तो स्वत:च घाबरतो! | पुढारी

शार्कसारखे दात, ज्याला तो स्वत:च घाबरतो!

मँचेस्टर : वेडेवाकडे दात, हा अनेकांचा प्रॉब्लेम असतो. ही समस्या कायमची निकालात काढण्यासाठी अनेक महागडे उपचारही करून घेतले जातात; पण काहीवेळा नंतर जी परिस्थिती होते, ती पाहिले तर आधीचे दात बरे होते, असे म्हणण्याची वेळ येते. मँचेस्टरमधील 22 वर्षीय जॅक जेम्सला नेमका याचाच अनुभव आला असून आता त्याचे दात इतके भयंकर झाले होते की, तो स्वत:ही आपले दात पाहण्यास कचरत असे!

जॅक जेम्सचे दात वेडेवाकडे होते आणि कॅमेर्‍यासमोर ठिकठाक दिसावे, यासाठी त्याने विदेशात जाऊन दात व्यवस्थित करण्यासाठी शस्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, ब्रिटनमध्ये जास्त खर्च येतो. पण तरीही त्याने काही डॉक्टरांना दाखवले व 20 लाखांचा खर्च सांगितला गेल्याने त्याने तुर्कीत ही शस्रक्रिया करवून घेतली.

जॅकने पुढे तुर्कीतील इस्तंबूल येथे उपचार करून घेतले आणि यासाठी त्याला 3 लाख रुपये खर्च आला; पण शस्रक्रिया झाल्यानंतर त्याने स्वत:चे दात पाहिले आणि डोक्यावर हात लावून घेण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच उरला नाही. या शस्त्रक्रियेनंतर त्याचे दात चक्क शार्कच्या दातासारखे झाले होते आणि डॉक्टरांनी ही आपली चूक नसल्याचा दावा केला.

आता पुन्हा शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागेल व आणखी साडेचार लाखांचा खर्च येईल, असे त्याला सध्या सांगितले गेले. बि—टनमधील खर्च तर यापेक्षा तिपटीने अधिक आहे, याचीही कल्पना दिली गेली. नाईलाजाने जॅकने सारे दात काढून कवळी बसवली. त्याचे शार्कसारखे दात मात्र आजही त्याच्या स्वप्नात येऊन त्याला छळत असतील तर त्यात आश्चर्याचे कारण नाही!

Back to top button