‘एआय’ करणार प्राचीन भाषेचा अनुवाद | पुढारी

‘एआय’ करणार प्राचीन भाषेचा अनुवाद

तेल अवीव : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ किंवा ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने सध्या अनेक थक्क करणारी कामे केली जात आहेत. आता इस्रायलमध्ये ‘एआय’च्या मदतीने एक असा प्रोग्रॅम विकसित करण्यात आला आहे ज्याच्या सहाय्याने अक्कादियन क्युनिफॉर्म लेखनाचा अनुवाद करता येऊ शकेल. या प्रोग्रॅमच्या मदतीने पुरातन लेखन प्रणालीस समजणे सोपे होईल तसेच तिचा अनुवादही करता येऊ शकेल.

क्यूनिफॉर्म लेखन ही मातीच्या पाट्यांवरील अंकन लिपी आहे. खिळ्याच्या आकाराच्या प्रतिकांचा यामध्ये कोरीव स्वरूपात वापर केला जातो. जगभरातील काहीच तज्ज्ञ या चिन्हांना ‘डिकोड’ करू शकतात. मात्र, आता ही प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. इस्रायलच्या पुरातत्त्व संशोधक व कॉम्प्युटर वैज्ञानिकांनी प्राचीन अक्कादियन क्यूनिफॉर्मसाठी एआय-संचालित ट्रान्सलेशन प्रोग्रॅम विकसित केला आहे. त्याच्या मदतीने एका क्लिकमध्येच तिला इंग्रजीत अनुवादित करता येऊ शकेल. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘एआय’च्या सहाय्याने आता पाच हजार वर्षांपूर्वीच्या लेखन प्रणालीसही अनुवादित करता येणे शक्य झाले आहे.

जागतिक स्तरावर अनेक ग्रंथालय, संग्रहालय आणि विद्यापीठांमध्ये क्यूनिफॉर्मसह कोरलेल्या मातीच्या पाट्या पाच लाखांहून अधिक आहेत. असा मजकूर भरपूर आहे आणि त्याचे जाणकार कमी आहेत. अक्कादियन क्यूनिफॉर्मही वाचता येणारे मोजकेच लोक आहेत. ही भाषा गेल्या दोन हजार वर्षांमध्ये कुणी बोलली किंवा लिहिलेली नाही. त्यामुळे या टॅबलेटस्चा केवळ एक छोटाच भाग आतापर्यंत अनुवादित झालेला आहे. आता तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांच्या प्रयत्नाने ही लिपी उलगडता येऊ शकेल. अक्कादियन ही मेसोपोटामिया आणि मध्य-पूर्वेत इसवी सनपूर्व 3000 ते इसवी सन 100 पर्यंत लिहिली आणि बोलली जात होती. त्यावेळेची ही एक लोकभाषा होती.

Back to top button