दृष्टी सुधारण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्त | पुढारी

दृष्टी सुधारण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्त

नवी दिल्ली : ही दुनिया पाहण्यासाठी द़ृष्टी अत्यावश्यक आहे. हल्ली ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याने अनेकांच्या डोळ्यांवर विपरित परिणाम होत असतो. अशावेळी विशिष्ट आहार द़ृष्टी सुधारण्यासाठी मदत करू शकतो. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

‘हेल्दी व्हेजिटेबल’चा विषय निघाला की पालकची भाजी हटकून येतेच. पालकमधील ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी लाभदायक असते. तसेच त्यामधील काही अँटिऑक्सिडंटस्ही स्वच्छ द़ृष्टीसाठी उपयुक्त ठरतात. डोळ्यांसाठी गाजराचे सेवन अत्यंत लाभदायक ठरते. त्यामधील बीटा कॅरोटिन आणि ‘अ’ जीवनसत्त्व रातांधळेपणाची समस्याही बर्‍याच अंशी कमी करू शकते.

मांसाहार करणार्‍यांसाठी मत्स्याहार हा डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेषतः साल्मन आणि टूनासारखे फॅटी फिश हृदयाबरोबरच डोळ्यांसाठीही गुणकारी असतात. त्यांच्या सेवनाने डोळ्यातील रेटिनाचे आरोग्य सुधारते. तसेच ड्राय आय आणि मोतीबिंदूचाही धोका कमी होतो. अंड्यामधीलही ’ई’ जीवनसत्व, ल्यूटिन आणि झिंक डोळ्यांसाठी गुणकारी आहे.

Back to top button