क्रिडा : विंडीज क्रिकेट साम्राज्याचा अस्त | पुढारी

क्रिडा : विंडीज क्रिकेट साम्राज्याचा अस्त

संपन्न परंपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. विंडीजचे खेळाडू उंचेपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचे आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा अन्य खेळांकडे वळत निघाल्याने विंडीजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे

संस्थान खालसा हे दोनच शब्द सध्याच्या वेस्ट इंडियन क्रिकेटचे वर्णन करण्यास पुरेसे ठरावेत. कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी या एकेकाळच्या दादा संघाची अवस्था बनली आहे. नख्या काढलेला आणि आयाळ हरवलेला सिंह आयुष्याच्या उत्तरकाळात जसा उमेदीचा काळ आठवून उसासे टाकतो तसाच हाही प्रकार. अर्थात, सध्याच्या युवा खेळाडूंना त्याची कितपत कल्पना असेल हेही सांगणे कठीण. कारण, त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. याला काळाचा महिमा असेही म्हणता येईल.

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचा ढिसाळ कारभार, मंडळाच्या तिजोरीत झालेला खडखडाट आणि युवा खेळाडूंनी अन्य खेळांत नशीब आजमावण्यासाठी सुरू केलेले तगडे प्रयत्न ही यामागील प्रमुख कारणे. गरिबी हेच गरिबीचे कारण असते, असा एक सिद्धांत अर्थशास्त्रात मांडला जातो. विंडीज क्रिकेटचे नेमके तसेच झाले आहे. सध्याच्या तरुण रक्ताला अमेरिकेतील बेसबॉल खुणावत आहे. काहींवर आयपीएलने मोहिनी घातली आहे आणि उरलेल्या बहुतांशना उसेन बोल्टप्रमाणे अ‍ॅथलेटिक्समध्ये नाव कमावण्याची आस लागली आहे. यातून उरलेल्या खेळाडूंमधून तिथल्या क्रिकेट मंडळाला संघ निवडावा लागत आहे.

आता तर वेस्ट इंडिजमध्येही कॅरेबियन लीग सुरू झाली आहे. त्यामुळे तिथल्या अस्सल क्रिकेटला घरघर लागली आहे. ती थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. याचा अर्थ विंडीज बेटांवर प्रतिभेची कमतरता आहे असे नव्हे. निसर्गतःच अफाट शारीरिक क्षमता असलेल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातच आपले करिअर करायचे आहे. तथापि, क्रिकेटला त्यांनी सगळ्यात तळाला ठेवले आहे. म्हणजेच अन्य कोणत्या खेळात नाव कमावता आले नाही तर(च) क्रिकेटकडे वळायचे अशी त्यांची मनोधारणा झाली आहे. हे सारे स्थित्यंतर कसे होत गेले याचे आकलन होण्यासाठी भूतकाळावर आधी नजर टाकावी लागेल. त्याखेरीज विंडीज क्रिकेटची महती कळणार नाही.

रोमांचकारी सुवर्णकाळ

1975 ते 1990 हा कालावधी म्हणजे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटमधील सोनेरी पानांची मालिका. त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य त्यावेळी मावळत नव्हता. माल्कम मार्शल, अँडी रॉबर्टस्, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग ही चौकडी तेव्हा आग ओकायची आणि जगभरातील नामांकित फलंदाजांची त्यांच्यापुढे त्रेधातिरपिट उडायची. याच काळात भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचे युग धुमाकूळ घालत होते. नाही म्हणायला लान्स गिब्जसारखा गुणवंत फिरकीपटू त्यांना मिळाला. तथापि, तो केवळ अपवाद ठरला. कारण हळूवार चेंडू टाकणे हे तिथल्या खेळाडूंच्या रक्तातच नव्हते.

एरवी भन्नाट वेगाने चेंडू समोरच्या फलंदाजावर सोडायचा हेच बाळकडू तिथल्या प्रत्येक गोलंदाजाला मिळाले होते. 1983 सालचा वर्ल्डकप आठवा. त्यावेळी मायकेल होल्डिंग सीमारेषेजवळून धावत येऊन गोलंदाजी करत असल्याचे जुन्या पिढीतील अनेकांनी पाहिले असेल. जर गोलंदाजीचा रनअपच असा लांबलचक असेल तर चेंडूच्या वेगाची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. तोच वारसा नंतर वेन डॅनियल, विन्स्टन डेव्हिस, पॅट्रिक पॅटरसन, इयान बिशप आदींनी पुढे नेला. त्यावर कळस चढवला तो कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अँब्रोज या जोडगोळीने. त्यानंतर मात्र विंडीजमधील वेगवान मारा खंगत गेला आणि आता तर भूतकाळातील रम्य आठवणींत रमणे एवढेच काय ते उरले आहे. फलंदाजीत सर ह्युबर्ट सटक्लिफ हे नाव कोणीच विसरणार नाही. त्यानंतर महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, क्लाईव्ह लॉईड, व्हिवियन रिचर्डस्, गॉडर्न ग्रीनिज, डेस्मंड हेन्स, रिची रिचर्डसन अशी किती तरी नावे सांगता येतील. हा वारसा ब्रायन लाराने पुढे नेला.

मात्र, सध्याच्या संघात तसे बेडर फलंदाज दिसत नाहीत. या संघाने लॉईडच्या नेतृत्वाखाली 1975 आणि पाठोपाठ 1979 साली विश्वचषक जिंकले. 1983 साली भारताने त्यांच्यावर आश्चर्यकारक विजय मिळवला. त्याचे चित्रण आजही आपल्याला यू ट्यूबवर पाहायला मिळते. त्यानंतरही वेस्ट इंडिज संघाचा जगभरात बोलबाला राहिला. तथापि, नामवंत खेळाडू निवृत्त होत गेल्यानंतर तेवढ्या ताकदीचे खेळाडू विंडीजला मिळाले नाहीत. नाही म्हणायला 2004 साली विंडीज संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. शिवाय 2012 आणि 2016 मध्ये टी-ट्वेंटी विजेतेपद पटकावले. हे अपवाद सोडले तर क्रिकेटच्या तिन्ही विभागांत म्हणजे कसोटी, वन डे आणि टी-ट्वेटीमध्ये हा संघ सध्या जवळपास तळाला आहे.

अन्य खेळांची नशा, अन् आर्थिक दुर्दशा

वेस्ट इंडिज हा एकसंध देश नाही हे आधी जाणून घेतले पाहिजे. कॅरेबियन समुद्रातील अनेक बेटांवरील समूहातून हा संघ निवडला जातो. या प्रत्येक देशाचे म्हणजेच बेटाचे स्वतंत्र चलन आहे. प्रत्येकाचे वेगळे राष्ट्रगीत आहे. तथापि, प्रत्येक बेटाचा आकार छोटा आहे. निसर्गसौंदर्यामुळे जगभरातील पर्यटक या बेटांना आवर्जून भेट देतात. त्यामुळे पर्यटन हाच तिथल्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत. कोरोनाकाळात या पर्यटनाचेही बारा वाजले. क्रिकेटमध्ये मुळातच पैसा कमी. तशातच तिथले क्रिकेट मंडळ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही. आजसुद्धा मानधनावरून मंडळ आणि खेळाडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसून येते. शिवाय एवढा वेळ रक्त आटवून खेळले तरी तुटपुंज्या मानधनात कुटुंब कसे चालवायचे याची विवंचना खेळाडूंना आहे.

बेसबॉल किंवा अ‍ॅथलेटिक्समध्ये असलेला प्रचंड पैसा कॅरेबियन बेटांवरील गुणवंत खेळाडूंना आकर्षित करत असेल तर त्यात नवल ते कसले. त्यामुळे क्रिकेटला कोणीही वाली उरलेला नाही. आजकाल कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांची फारशी उपस्थिती लाभत नाही. पाच दिवस चालणार्‍या सामन्यांपेक्षा वन डे किंवा टी-ट्वेटी सामन्यांवर प्रेक्षक तुटून पडत असल्याचे दिसते. कोणत्याही व्यावसायिक खेळाडूची कारकीर्द दीर्घ काळासाठी नसतेच. उमेदीच्या काळातच त्याला पैसा कमवायचा असतो. क्रिकेटमध्ये याची काहीही शाश्वती नाही. विंडीजमध्ये तर नाहीच नाही.

1980 च्या दशकात विंडीजच्या कसोटी संघातून खेळलेल्या अनेक क्रिकेटपटूंची अवस्था सध्या दयनीय आहे. इच्छा असूनही तिथले क्रिकेट मंडळ या खेळाडूंसाठी काहीही करू शकत नाही. कारण या मंडळाकडे माजी खेळाडूंचा काळजी घेण्यासाठी पुरेसा पैसाच नाही. सध्याच्या खेळाडूंनी हे सगळे चित्र जवळून पाहिले आहे. त्यामुळेच त्यांनी हमखास बक्कळ पैसा देणार्‍या अन्य खेळांचा रस्ता धरल्याचे दिसून येते. अमेरिकन बास्केटबॉलमध्ये (एनबीए) अक्षरशः पैशाचा पूर वाहत असतो.

वेस्ट इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना तिथे प्रचंड मागणी आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये उसेन बोल्ट कसा अब्जाधीश झाला हेही युवा खेळाडूंनी पाहिले आहे. परिणामी या युवाशक्तीला मैदानी खेळांबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. त्यातही प्रचंड पैसा आहे. ही सगळी प्रज्ञा अन्य खेळांकडे वळत चालल्याने वेस्ट इंडिजमधील क्रिकेटला वाली कोण, असा मूलभूत प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. नामांकित खेळाडूंना त्यांच्या अ ब आणि क या श्रेणीनुसार दोन ते तीन कोटी रुपये वार्षिक मानधन मिळत असले तरी कधी संघातून डच्चू दिला जाईल याची शाश्वती नसते. म्हणजे सातत्याने प्रत्येकाच्या डोक्यावर टांगती तलवार. याच्या उलट बास्केटबॉल किंवा बेसबॉलमध्ये साधारणपणे एक अथवा दोन तासांत सामना संपतो. तेथे आपल्या अंगभूत ऊर्जेचा पूर्ण क्षमतेने वापरही करता येतो. पैशाचे म्हणाल तर क्रिकेटच्या कित्येक पटीने अर्थार्जन या दोन्ही खेळांत होत जाते. शिवाय एकदा नाव झाले की, मग जाहिरातींतूनही अफाट पैसा मिळतो.

कारकीर्द संपल्यानंतर समालोचक किंवा प्रशिक्षक म्हणूनही काम करण्याची संधी मिळते. मात्र, त्यासाठी आधी पाया भक्कम असणे गरजेचे आहे. त्याचीच वानवा विंडीज क्रिकेटमध्ये दिसून येते. अलीकडे तर तिथल्या क्रिकेट मंडळाची दादागिरीही वाढत चालली आहे. सात वर्षांपूर्वी मंडळ आणि खेळाडू यांच्यातील तणावाने टोक गाठले होते. जर खेळाडूंनी करारावर सही केली नाही तर करारच रद्द करण्याची धमकी तेव्हा मंडळाने दिली होती. दिवसेंदिवस विंडीज क्रिकेटमध्ये वशिलेबाजीही बोकाळत चालली आहे. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना आपली कदर होत नसल्याची सल लागून राहिली आहे. केवळ पैसा हेच विंडीजमधील क्रिकेटच्या दैन्यावस्थेचे एकमेव कारण नाही. त्याच्या जोडीला अन्य अनेक घटकही तेवढेच कारणीभूत आहेत. पंधरा देशांचा संघ वेस्ट इंडिज म्हणून खेळतो तेव्हा काही प्रमाणात भांड्याला भांडे लागणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून या भांड्यांचा खणखणाट वाढत चालला आहे. ही धोक्याची घंटा म्हटली पाहिजे. यावर उपाय म्हणजे आमूलाग्र बदल.

त्यासाठी तिथल्या मंडळालाच पुढाकार घेण्याखेरीज गत्यंतर नाही. खेळाडूंना सर्वप्रथम पुरेसे मानधन आणि तेसुद्धा ठरलेल्या वेळेत मिळेल याची खबरदारी घेणे हे मंडळाचे काम आहे. त्यासाठी मंडळाने नवनवे आर्थिक स्रोत शोधायला हवेत. येथे एकच उदाहरण पुरेसे आहे. भारतीय क्रिकेट मंडळाला संपन्न करण्यात जगमोहन दालमिया आणि इंदरजित सिंग बिंद्र यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. जसे की, दालमिया यांनी मैदानावरील सीमारेषासुद्धा जाहिरातदारांना विकली. चेंडू जेव्हा सीमापार जातो तेव्हा सीमारेषेवरही आपल्याला विविध उत्पादनांच्या जाहिराती तेथे झळकताना दिसतात.

यांसारख्या उपायांतूनच आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत संस्था बनले आहे. तसाच मार्ग विंडीजच्या क्रिकेट मंडळाने अनुसरणे गरजेचे आहे. त्याखेरीज मरणपंथाला लागलेल्या स्थानिक क्रिकेटला उभारी देणे आणि क्रिकेटचे काही प्रमाणात तरी व्यावसायिकीकरण करणे हे काही उपाय असू शकतात. क्रिकेट हीच आजही वेस्ट इंडिजची ओळख आहे. त्यातील इंडिज हा शब्द तर आपल्यालाही त्यांच्याशी भावनिकद़ृष्ट्याही जवळ आणतो. संपन्न पंरपरा लाभलेल्या विंडीजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. प्रबळ इच्छाशक्ती दाखवली तर त्यातूनही मार्ग निघू शकतो. अन्यथा वेस्ट इंडियन क्रिकेट इतिहासजमा व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

सुनील डोळे

Back to top button