जेम्स वेब दुर्बिणीने शोधले प्राचीन ‘वॉटर वर्ल्ड’ | पुढारी

जेम्स वेब दुर्बिणीने शोधले प्राचीन ‘वॉटर वर्ल्ड’

वॉशिंग्टन : ‘जीजे 1214 बी’ नावाचा एक बाह्यग्रह आपल्या सौरमालिकेच्या जवळच आहे. पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्ष अंतरावरील एका तार्‍याभोवती हा ‘मिनी-नेपच्यून’ वाटणारा ग्रह भ्रमण करतो. आपल्या आकाशगंगेत असे छोट्या आकाराचे व वायुयुक्त असे अनेक ग्रह आहेत. त्यांच्याविषयी नेहमीच संशोधकांना कुतुहल वाटत आले आहे. आता या बाह्यग्रहाच्या इतिहासात डोकावून पाहण्यास संशोधकांना यश आले आहे. त्याच्यामध्ये चक्क पाण्याच्या अस्तित्वाचीही चिन्हे दिसून आली आहेत. त्यामुळे या ‘वॉटर वर्ल्ड’कडे संशोधक अधिकच कुतुहलाने पाहत आहेत.

यापूर्वीही या दूरस्थ ग्रहाचे निरीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न झाले होते. मात्र, त्याच्याभोवती असलेल्या ढगांच्या दाट स्तरामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता जेम्स वेबसारख्या अत्यंत शक्तिशाली अशा अंतराळ दुर्बिणीमुळे त्याचे निरीक्षण करणे सोपे झाले आहे. दुर्बिणीच्या इन्फ्रारेड हीट व्हिजनमुळे या ग्रहाभोवती असलेल्या ढगांमधूनही त्याचे निरीक्षण करता येते.

या निरीक्षणाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की या ग्रहाच्या वातावरणात पाण्याची वाफही आहे. त्यावरून असे दिसते की एकेकाळी हा ग्रह ‘वॉटर वर्ल्ड’ असावा. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील रॉब झेलेम यांनी सांगितले की गेल्या जवळजवळ दहा वर्षांपासून आम्हाला केवळ इतकेच वाटत होते की या ग्रहाचे वातावरण ढगाळ आहे.

आमच्या टीमने जेम्स वेब दुर्बिणीच्या ‘मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रूमेंटचा वापर केला व ग्रहाचे तापमानही मोजण्यात यश मिळवले. त्याच्या दिवस व रात्रीबाबतची माहितीही घेण्यात आली. या ग्रहाच्या रचनेविषयीही समजून घेण्यात आले. त्याचे दिवस-रात्रीचे तापमान नाट्यमयरीत्या बदलते. दिवसा त्याचे तापमान 535 अंश फॅरेनहाईट म्हणजेच 280 अंश सेल्सिअस असते तर रात्री ते एकदम 100 अंश फॅरेनहाईटने उतरते. त्याच्यावर एकेकाळी बर्फाळ तसेच पाण्याने समृद्ध अशी सामग्री असावी याचे स्पष्ट संकेतही मिळाले.

Back to top button