ऑक्टोपसमध्ये दिसली अनोखी ‘ब्रेन वेव्ह’ | पुढारी

ऑक्टोपसमध्ये दिसली अनोखी ‘ब्रेन वेव्ह’

रोम : संशोधकांनी ऑक्टोपसच्या मेंदूत एक अशी लहर किंवा कंपन शोधून काढले आहे जी यापूर्वी कोणत्याही प्राण्यामध्ये दिसून आली नव्हती. ही ‘ब्रेन वेव्ह’ प्रथमच समोर आल्याचे आजपर्यंतच्या नोंदीतून आढळले.

मुक्तपणे संचार करणार्‍या ऑक्टोपसमध्ये प्रथमच अशी ‘ब्रेन वेव्ह’ आढळून आली आहे. या वेव्ज ऑक्टोपसच्या मेंदूंमध्ये इलेक्ट्रोडस् बसवून व त्यांना त्वचेखालील डाटा लॉगर्सशी कनेक्ट करून टिपण्यात आल्या. सेफॅलोपोड प्राण्यांच्या मनातील हालचालींचा वेध घेण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला. ‘सेल’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इटलीतील नेपल्स युनिव्हर्सिटीतील तामर गुटनिक यांनी सांगितले की ऑक्टोपसमध्ये आढळलेल्या वेव्जच्या पॅटर्नपैकी काही अ‍ॅक्टिव्हिटी पॅटर्न्स हे हिप्पोकॅम्पसच्या पॅटर्नशी मिळते-जुळते आहेत. मात्र, ‘2 एचझेड’सारखे काही अनोखे पॅटर्नही आम्हाला आढळून आले. ते अन्य कोणत्याही प्राण्यांमध्ये आढळून आले नव्हते. ऑक्टोपस आणि ‘सेफॅलोपोडस्’ कुळातील स्क्वीड किंवा कटलफिशसारखे अन्य नातेवाईक यांच्या मेंदूबाबत मानवाला अगदी तिसर्‍या शतकापासूनच कुतुहल वाटत आलेले आहे.

Back to top button