वाढत्या वयामुळे केस पांढरे होण्याचं ‘हे’ आहे कारण… | पुढारी

वाढत्या वयामुळे केस पांढरे होण्याचं ‘हे’ आहे कारण...

लंडन : वाढत्या वयानुसार केस पांढरे का होतात, यामागील कारण शोधून काढल्याचा दावा अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे. केस काळे राखणार्‍या पेशी जेव्हा परिपक्व होण्याची क्षमता गमावतात तेव्हा केस पिकू लागतात. या पेशी परिपक्व झाल्या, तर त्यांचं रूपांतर मेलनोसाईटस्मध्ये होतं. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.

न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने उंदरांवर प्रयोग केला. उंदरांमध्ये अशाच स्वरूपाच्या पेशी असतात. संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांचा दावा आहे की, या शोधामुळे केस पुन्हा काळे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात मदत मिळेल. ब्रिटिश असोसिएशन ऑफ डर्मेटालॉजिस्ट (बीएडी) संस्थेच्या मते मेलनोसाईटस्वर अभ्यासातून कॅन्सर आणि अन्य गंभीर आजारांसंदर्भात सखोल माहिती मिळवण्यासाठी तसंच उपचारांत याची मदत होऊ शकेल.

केस का पिकतात?

आपले वय वाढते आणि केस गळत जातात ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. ती आयुष्यभर सुरू राहते. त्वचेच्या ज्या छिद्रांमधून केस निघतात, तिथेच केसांना काळे ठेवणार्‍या पेशी असतात. या पेशी सातत्याने तयार होत असतात. तसेच नष्टही होत असतात. स्टेम सेलच्या माध्यमातून या पेशींची निर्मिती होत असते. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या मते, स्टेम सेल जेव्हा पेशींची निर्मिती थांबतात तेव्हा केस काळे होऊ लागतात.

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लँगवन हेल्थ चमूने या पेशींची निर्मिती आणि सातत्याने वाढ व्हावी, यासाठी स्पेशल स्कॅनिंग आणि प्रयोगशाळेच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. केसांचे वय वाढते, तसे ते गळू लागतात. त्यांच्या जागी नवे केस येतात. काही काळानंतर मेलनोसाईटस् पेशी संथ होतात.

स्टेम सेल आपल्या जागी स्थिर होतात आणि त्यामुळे मेलनोसाईटस् विकसित होऊ शकत नाही. यामुळे केसांना रंग मिळण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. मग, केस पांढरे होऊ लागतात.

पांढरे केस काळे होऊ शकतात का?

न्यूयॉर्क विद्यापीठाचे लँगवन हेल्थचे पीएचडी स्कॉलर आणि संशोधन चमूचे प्रमुख डॉ. सी सुन यांनी सांगितले की, मेलनोसाईटस् स्टेम सेल केस काळे राखण्यात काम करते, हे समजून घेण्यासाठी आमचे संशोधन लाभदायी ठरेल. मेलसोनाईटस् स्टेम सेल्सना पक्के केले जाऊ शकेल आणि पिकलेले केस पुन्हा काळे होऊ शकतील. साधारणपणे वृद्धत्वामुळे केस पिकतात. अकाली केस पिकण्याचे कारण प्रदूषण हेही असते. काही संशोधकांच्या मते दडपण, ताणतणावामुळेही केस पांढरे होतात. तणावाचे कारण कमी करूनही केस पिकणे लांबवणे शक्य आहे. काहीना असे वाटते की, केस पिकण्यामागे अनुवांशिक कारणं असतात. असे लोक केसांना वेगवेगळे रंग लावतात.

Back to top button