Piggy bank : ‘पिगी बँक’ कधी आली? | पुढारी

Piggy bank : ‘पिगी बँक’ कधी आली?

नवी दिल्ली : ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. बालपणी आपल्याला अनेक गोष्टींचे धडे दिले जात असतात. त्यामध्येच पैशांची बचत करण्याचाही एक व्यावहारिक धडा असतो. हा धडा आपण ‘पिगी बँक’च्या रूपाने शिकत असतो. ‘पिग’ म्हणजेच डुकराच्या आकाराच्या भिशीत अनेकांनी पैसे साठवले असतील. पूर्वी यासाठी मातीच्या गोलाकार भिशी असायच्या. पैसे काढायच्या वेळी ती फोडावीच लागे! मात्र अशा भिशींचे अस्तित्व कधीपासून निर्माण झाले हे माहिती आहे का?

असे म्हणतात की, 15 व्या शतकापासून पाश्चात्त्य देशांमध्ये पिगी बँकचा वापर सुरू झाला होता. त्यावेळी काच किंवा धातूची भांडी महाग असल्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर होत असेल. या मातीला ‘PYGG’ असेही म्हटले जायचे. तेव्हा पैसे साठवण्यासाठीचे भांडेसुद्धा याच मातीपासून बनवले जायचे. त्यावरूनच त्या भांड्याला ‘PYGGY’ असे म्हटले जाऊ लागले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे PYGG बँक किंवा PYGGY बँक पूर्णपणे बंद होते. पैसे आत जातील इतकीच जागा सोडली जात होती. गरजेच्या वेळी हे PYGGY तोडून त्यातून पैसे मिळवले जात होते. काळ पुढे गेला, PYGGY बँकची जागा काही कलात्मक गोष्टींनी घेतली. पण, त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही.

इंग्लंडमध्ये 19 व्या शतकात कुंभारांनी या मातीच्या भांड्यांना आकर्षक आकार देण्यास सुरुवात केली. लहान मुलांमध्येही लोकप्रियता मिळवण्याच्या हेतूने या PYGGY ला ‘Pig’चा आकार देण्यात आला. हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की, पिगी बँकचे प्रस्थ जगभरात पसरले आणि स्थिरावलेसुद्धा. आजही अनेकांकडेच ही पिगी बँक आहे, काही जणांकडे Pig च्या आकाराची पिगी बँक नसली तरीही ही मंडळी पैसे साठवतात त्या भांड्याचा उल्लेख मात्र पिगी बँक म्हणूनच करतात!

Back to top button