दोनवेळा पृथ्वी बनली होती बर्फाचा गोळा | पुढारी

दोनवेळा पृथ्वी बनली होती बर्फाचा गोळा

वॉशिंग्टन : सध्या पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत असल्याने शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करू लागले आहेत. मात्र, पृथ्वी दोनवेळा पूर्णपणे बर्फाचा गोळा बनली होती. उल्लेखनीय म्हणजे, अशा स्थितीतही पृथ्वीवर जीवनाचे अस्तित्व कायम राहिले.

जगभरातील शास्त्रज्ञ व लोक सध्या पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जलवायू परिवर्तन हा एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असला, तरी सध्या यास मानवी हस्तक्षेप कारणीभूत ठरत आहे. अशीच स्थिती जर कायम राहिली, तर पृथ्वी ही माणसासाठी राहण्यायोग असणार नाही. असे असले तरी एकेकाळी आपली पृथ्वी ही दोनवेळा बर्फाचा गोळा बनली होती, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. अशा स्थितीतही पृथ्वीवरील जीवन अस्तित्वात राहिले, हे विशेष.

शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे 6.5 अब्ज वर्षे वय असलेली आपली पृथ्वी सुमारे 72 कोटी आणि 63.5 कोटी वर्षांपूर्वी पूर्णपणे गोठली होती. जर त्यावेळी पृथ्वीला दुसर्‍या ग्रहावरून पाहिले असते, तर पृथ्वी एक बर्फाचा गोळाच आहे, असे वाटले असते. ‘चायना युनिव्हर्सिटी ऑफ जिओ सायन्स’च्या शास्त्रज्ञांनी यासंंबंधीचे संशोधन केले आहे.

जीवाश्मांच्या संशोधनातून शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अब्जावधी वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात सागरी आवासिय पर्यावरण होते.
पृथ्वीच्या इतिहासात दोनवेळा ती बर्फाचा गोळा बनली होती. यास स्नोबॉलच्या घटना म्हणून ओळखल्या जातात. वैज्ञानिक भाषेत त्यांना स्टर्टियन आणि मॅरिनोअन हिमयुग म्हणून ओळखले जातेे. ही दोन्ही हिमयुगे क्रायजेनिक काळात म्हणजे 72 ते 63.5 कोटी वर्षांपूर्वी घडून गेली आहेत.

जिओ सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या दोन हिमयुगांनी पृथ्वीवर जीवन विकसित होण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. हिमयुगातही पृथ्वीवरील बहुकोशिकेय जीवन कायम राहिले. त्यानंतर जीवनाच्या विकासास सुरुवात झाली.

Back to top button