चंद्रावरील ‘काचेच्या मोत्यां’मध्ये अब्जावधी टन पाणी! | पुढारी

चंद्रावरील ‘काचेच्या मोत्यां’मध्ये अब्जावधी टन पाणी!

बीजिंग : चंद्र हा कोरडाठाक आहे, तिथे पाणी नाही असेच अनेक वर्षे मानले जात होते. मात्र भारताच्या ‘चांद्रयान-1’ मोहिमेत सर्वप्रथम जगाला समजले की, चंद्रावरही पाण्याचे अस्तित्व आहे. आता तर संशोधकांनी म्हटले आहे की, चांद्रभूमीवर अब्जावधी टन पाण्याचा साठा आहे. अर्थात, तो चंद्रावर विखुरलेल्या ‘ग्लास बीड्स’मध्ये कैद झालेला आहे. भविष्यात चंद्रावरील मानवी मोहिमेत हे काचेच्या मोत्यांमधील पाणी उपयुक्त ठरू शकते.

वैज्ञानिकांनी नुकतेच सांगितले की, 2020 मधील चीनच्या रोबोटिक ‘चेंगी-5’ या मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणलेल्या चंद्रावरील मातीच्या तपासणीतून समजले की, त्यामध्ये हे ग्लास बीड्स किंवा काचेचे सूक्ष्मकण आहेत. त्यांच्यामध्ये पाण्याचेही अणू आहेत, जे चंद्राच्या पृष्ठभागावर सौर वार्‍यांशी क्रिया करून बनतात. ‘नेचर जियोसायन्स’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संशोधक सेन हू यांनी सांगितले की, चंद्रावर सातत्याने अनेक खगोल आदळत असतात. त्यामध्ये लहान-मोठ्या आकाराच्या लघुग्रहांचाही समावेश आहे. याच ‘हाय-एनर्जी फ्लॅश हीटिंग’ घटना ग्लास बीड्स म्हणजेच काचेच्या मोत्यांचे उत्पादन करतात. सौर हवा भारीत कणांची, मुख्यतः प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सची एक धारा असते, जी सूर्याच्या कोरोनामधून म्हणजेच बाह्य वातावरणातून निघते. सौर हवेमुळे निर्माण होणार्‍या पाण्याचे उत्पादन काचेच्या मोत्यांच्या पृष्ठभागावरील ऑक्सिजनबरोबर सौर हायड्रोजनशी क्रिया झाल्याने होते.

भविष्यातील चांद्र मोहिमेसाठी तसेच चंद्रावर दीर्घकाळ राहणार्‍या अंतराळवीरांसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. केवळ पिण्यासाठीच नव्हे, तर इंधन म्हणूनही पाणी गरजेचे आहे. ते असे काचेचे मोती गरम करून मिळवता येऊ शकते. ‘चेंगी-5’ मिशनमध्ये सुमारे 1.7 किलोग्रॅम माती आणि काचेचे 32 मोती गोळा करण्यात आले होते. ते दहा ते शेकडो मायक्रोमीटर रुंदीचे होते. त्यांच्या वजनाच्या हिशेबात प्रती दशलक्ष सुमारे 2 हजार भागांपर्यंत पाण्याचे प्रमाण आढळून आले.

Back to top button