तब्बल अडीच किलो वजनाचा वडापाव! | पुढारी

तब्बल अडीच किलो वजनाचा वडापाव!

अहमदाबाद : वडापाव केवळ महाराष्ट्रातच लोकप्रिय आहे असे नाही. सध्याच्या जमान्यात भारताच्या विविध प्रांतांतील अनेक खाद्यपदार्थ संपूर्ण देशभर पोहोचलेले आहेत. दाबेलीसाठी प्रसिद्ध असलेल्या कच्छमध्ये वडापावचीही मोठी चलती आहे. मुंबई स्टाईल वडापाव व्यतिरिक्त येथे कच्छ स्टाईल वडापावही मोठ्या आवडीने खाल्ला जातो. भुजच्या एका तरुणाने तब्बल 2.65 किलोचा जम्बो वडापाव तयार केला आहे. या वडापावचं वजन पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.

संदीप बुद्धभट्टी आणि त्यांचा मुलगा देव बुद्धभट्टी हे गेल्या सात वर्षांपासून भुजमध्ये वडापाव आणि भजीचा व्यवसाय करतात. काहीतरी वेगळं करण्याचा विचार करीत यांनी जम्बो वडापाव तयार केला. तब्बल अडीच किलोचा वडापाव तयार करताना संदीप आणि देव यांना अनेकदा अपयश आले. मात्र सातव्यांदा त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात 2.65 किलोचा वडापाव तयार केला. ज्यात 1.25 किलोचा वडा आणि 650 ग्रॅमचा पाव आहे.

देवला 2.65 किलोचा वडापाव तयार करण्यासाठी इन्फ्लूएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि सोसायटी प्लांट फाऊंडेशनद्वारा जगातील सर्वात मोठा वडापाव तयार करण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. खाद्यपदार्थांबाबतही अनेक विक्रम केले जात असतात. त्यामध्ये त्यांच्या आकाराच्या विक्रमांचाही समावेश असतो. आता वडापावबाबतही असाच विक्रम करण्यात आलेला आहे.

Back to top button