अंतराळ स्थानक उपग्रहाच्या धडकेपासून बचावले! | पुढारी

अंतराळ स्थानक उपग्रहाच्या धडकेपासून बचावले!

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला एका कृत्रिम उपग्रहाच्या म्हणजेच सॅटेलाईटच्या धडकेपासून वाचवण्यासाठी ‘जोर लावावा’ लागला. स्थानकाच्या इंजिनना सहा मिनिटांपेक्षा अधिक काळ चालू ठेवावे लागले. सॅटेलाईटची धडक टाळण्यासाठी स्टेशनला आपल्या कक्षेतून थोडे वर उचलावे लागले. गेल्या गुरुवारीच या स्थानकावर ‘स्पेस एक्स क्रू-6’ मोहिमेतील चार अंतराळवीर सुरक्षितपणे पोहोचले आहेत.

‘नासा’ने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की सोमवारी ऑर्बिटल स्टेशन पृथ्वीभोवती फिरत असलेल्या एका उपग्रहाच्या मार्गात आले होते. डॉक केलेल्या आयएसएस प्रोग्रेस 83 रिसप्लाय शिपने आपले इंजिन सुमारे सहा मिनिटे फायर केले. त्यामुळे स्टेशनची कक्षा थोडी वर उचलली गेली. ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरमधील सँड्रा जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार हा उपग्रह 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. तो अर्जेंटिनाचा अर्थ-ऑब्झर्व्हर ‘नुसॅट-17’ सॅटेलाईट आहे. आता अवकाशीय कचरा व सॅटेलाईटस्च्या गर्दीचा धोका स्पेस स्टेशनलाही निर्माण झालेला आहे. ‘स्पेस एक्स’च्या ‘क्रू-6’ मोहिमेचे गेल्या गुरुवारी यशस्वी लाँचिंग झाले होते.

मात्र, एका तांत्रिक बिघाडामुळे ‘स्पेस एक्स’च्या कॅप्सूलला स्पेस स्टेशनच्या ऑर्बिटिंग लॅबपासून 65 फूट अंतरावर 23 मिनिटे वाट पाहावी लागली होती. अखेर लाँचिंगच्या 25 तासांनंतर गुरुवारी रात्री एक वाजून 40 मिनिटांनी अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात प्रवेश केला. अंतराळवीरांच्या यानाला स्पेस स्टेशनला जोडण्यासाठी बारा हुक्स कनेक्ट करावी लागतात. त्यापैकी एका हुकचा स्विच खराब झाला होता. मात्र, लगेचच त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली.

स्विच खराब असल्याची सूचना मिळाल्यानंतर ‘स्पेस एक्स’ने क्रू मेंबर्सना धैर्य ठेवण्याचे आवाहन केले होते. ते दोन तास आहे त्या स्थितीत कोणत्याही समस्येशिवाय राहू शकतात असे कळवण्यात आले होते. स्विचमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर हे यान स्पेस स्टेशनला डॉक झाले व अंतराळवीर कॅप्सूलमधून स्थानकात आले. ही एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ची सहावी ऑपरेशनल क्रू फ्लाईट होती. त्यामध्ये ‘नासा’चे दोन, रशियाचा एक आणि यूएईचा एक असे चार अंतराळवीर होते. हे अंतराळवीर आता सहा महिने स्थानकावर राहून विविध वैज्ञानिक प्रयोग करतील. मात्र, मोहिमेच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यासमोर अशी वेगवेगळी आव्हाने उभी राहत आहेत.

Back to top button