चांगल्या झोपेने भाषा होते समृद्ध | पुढारी

चांगल्या झोपेने भाषा होते समृद्ध

वॉशिंग्टन : गाढ झोपेचा लाभ तन-मनाच्या आरोग्यासाठी होत असतो. आता यॉर्क युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की चांगली झोप व स्वप्नांचा थेट संबंध आपल्या भाषेशीही आहे. चांगल्या झोपेमुळे आपली भाषाही समृद्ध होत असते. दोन रात्रींची चांगली झोप आपल्या भाषेत एक नवा शब्द जोडत असते. ही प्रक्रिया आयुष्यभर सुरू राहते!

झोपेत आपली भाषा ‘अपडेट’ होत असते. असेच कुठे तरी कानावर पडलेले शब्द आपल्या भाषेचा हिस्सा बनत असतात. त्याचे कारण आपल्या सुप्त मनाचा आवाजाकडे असलेला ओढा. झोपेत मेंदू आवाज आणि शब्दांशी खेळत असतो. दहा वर्षांच्या वयापर्यंत ही प्रक्रिया अधिक वेगाने घडत असते. त्यामुळे मुलांना चांगली झोप मिळणे आवश्यक असते. मुलांना दीर्घ झोपेत भाषा शिकण्याची चांगली क्षमता मिळते. संशोधक गॅरेथ गॅसकेल यांनी सांगितले की झोपेत आवाजांची अतिशय हालचाल असते.

त्यामुळे आपल्याला पडणारी स्वप्नंही अनेक भाषांमधील असतात. स्वप्नांमध्ये आपण नुकतेच शिकू लागलेली भाषाही बोलत असतो. इंग्रजी शिकत असलेला माणूस स्वप्नात इंग्रजीत बोलत असतो. अशावेळी आपल्या शब्दकोषात शब्दांची भर पडत असते. बहुभाषी स्वप्नांचे अनेक स्तर असतात. त्यामध्ये एकाच वेळी अनेक भाषा असतात. अनेक वेळा यामध्ये आपली मातृभाषा असत नाही. अनेक वेळा ‘लिंग्विस्टिक एंग्झायटी ड्रीम्स’ही येतात. त्यामध्ये माणूस एखाद्या अन्य भाषेशी संघर्ष करीत असतो. आपल्या स्वप्नांच्या डिक्शनरीत नवे शब्द शोधतो. त्याच्या मेंदूत असे अनेक शब्द येतात ज्यांचा अर्थ त्यालाही माहिती नसतो!

Back to top button