‘इस्रो’चेही अवकाशीय कचर्‍याकडे लक्ष | पुढारी

‘इस्रो’चेही अवकाशीय कचर्‍याकडे लक्ष

नवी दिल्ली : अनेक देशांचे निकामी कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान व रॉकेटचे भाग व अन्य प्रकारचा कचरा सध्या पृथ्वीभोवती फिरत आहे. अत्यंत वेगाने फिरत असलेला हा अवकाशीय कचरा जगाच्याच चिंतेचा विषय बनला आहे. हा कचरा आकाराने लहान असला तरी भविष्यातील मोहिमांमधील अंतराळयान किंवा सॅटेलाईटस्ना धोक्याचा ठरू शकतो. या कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत व त्यामध्येच भारताच्या ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थेचाही समावेश आहे.

कोणत्या देशाच्या अंतराळ सामग्रीचा किती कचरा पृथ्वीच्या खालील स्तरातील कक्षेत फिरत आहे याची एक यादीच ‘यूएस स्पेस डॉट कॉम’वर देण्यात आलेली आहे. स्पेस ट्रॅक वेबसाईटनेही याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यानुसार 20 जानेवारी 2023 पर्यंत अंतराळात फिरत असलेल्या भारतीय वस्तूंमध्ये एकूण 111 पेलोड आणि 105 अवकाशीय अपशिष्ट वस्तूंचा समावेश आहे. अवकाशीय कचर्‍याच्या वाढत्या धोक्याबाबत 1990 च्या प्रारंभापासूनच ‘इस्रो’ व अन्य तज्ज्ञांकडून अध्ययन सुरू आहे.

2022 मध्ये इस्रो सिस्टीम फॉर सेफ अँड सस्टेनेबल ऑपरेशन्स मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली. तिचा उद्देश ज्या अवकाशीय वस्तू धडकून धोका निर्माण करू शकतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे, अंतरीक्ष पर्यावरणाच्या विकासात सुधारणा करणे आणि अवकाशीय कचर्‍यापासून निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी ठोस हालचाली करणे हा आहे. याबाबत 2022 मध्ये ‘इस्रो’कडून 22 अध्ययने झालेली आहेत. ‘नासा’च्या माहितीनुसार पृथ्वीच्या कक्षेतील अवकाशीय कचर्‍यात 27 हजारांपेक्षाही अधिक तुकडे आहेत. अनेक असे सूक्ष्म तुकडे आहेत ज्यांना ट्रॅक करणेही कठीण आहे. हा कचरा पृथ्वीच्या खालील कक्षेत ताशी 15,700 मैल वेगाने फिरत आहे.

Back to top button