Romantic couples : रूपेरी पडद्याच्या रोमँटिक जोड्या | पुढारी

Romantic couples : रूपेरी पडद्याच्या रोमँटिक जोड्या

आपल्या देशातील तरुणाईला सर्वाधिक पसंद काय आहे असे जर विचारले तर त्याचे उत्तर चित्रपट आणि क्रिकेट असेच द्यावे लागेल. जगातील सर्वात मोठा चित्रपट व्यवसाय भारतातच आहे. हिंदीबरोबरच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बनत असतात. चित्रपटांनी आजपर्यंत जे विविध विषय हाताळले आहेत त्यामध्ये सर्वाधिक समावेश अर्थातच प्रेमासारख्या तरल, नाजूक व तितक्याच सुंदर भावनेचा आहे. प्रेमकथांवर आधारित अनेक चित्रपट आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावरही घेतले. त्यामधील काल्पनिक पात्रे, कथा आणि गाणीच नव्हे तर अभिनेते आणि अभिनेत्रींनाही लोकांनी आपल्या भावविश्वात अढळ स्थान दिले. हिंदी चित्रपटांमधील अशाच काही रोमँटिक जोड्यांविषयी (Romantic couples) ज्यांनी पडद्यावर प्रेमीयुगुलाची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले…खास व्हॅलेंटाईन डे निमित्त!


‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार आणि ‘व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा’ असे पाश्चात्यांनी बिरुद दिलेली सौंदर्यसम—ाज्ञी मधुबाला यांनी ‘अमर’, ‘तराणा’सारखे अनेक चित्रपट एकत्र केले. मात्र, दोघांची जोडी खर्‍या अर्थाने ‘अमर’ झाली ती ‘मुघल-ए-आझम’मुळे. सर्वार्थाने भव्य-दिव्य असलेला हा ‘मॅग्नम ओपस’ चित्रपट हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. (Romantic couples) त्यामधील सलीम आणि अनारकलीच्या रूपातील दिलीप-मधुबालाची जोडी आजही हिट आहे. 14 फेब—ुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच जन्मलेली मधुबाला तर अनारकलीच्या भूमिकेत अक्षरशः ‘होम ग्राऊंड’वरच होती. ‘पर्दा नही जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या’ किंवा ‘मौत वोही जो दुनिया देखे, घुट घुट के यूं मरना क्या’ असे अकबराला गाण्यातून धीटपणे ऐकवणारी मधुबाला कोण विसरेल? बडे गुलाम अली खाँ यांच्या सुरांचा परीसस्पर्श झालेला सलीम-अनारकलीचा तो पिसाचा सीनही विसरता येणे शक्यच नाही!

‘कितनी जबाने बोले, लोग हमजोली, दुनिया में प्यार की एक है बोली’ असे ठासून सांगणार्‍या ‘एक दुजे के लिए’ (Romantic couples) चित्रपटाला आजही मोठाच प्रेक्षकवर्ग आहे. दोन वेगवेगळ्या प्रांतातून गोव्यात राहण्यासाठी आलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणीची ही हळवी शोकांतिका लोकांच्या मनाला 1981 मध्येही स्पर्श करून गेली होती आणि आजही कुणी हा चित्रपट पाहिला तरी तो या चित्रपटाच्या प्रेमात पडतोच! केवळ चित्रपटातील सपनाच ‘जिसमें जवान हो के बदनाम हम हुए, उस शहर, उस गली, उस घर को सलाम’ म्हणत सलामी देत नाही तर पाहणारे प्रेक्षकही देतात! वासू-सपनाची जोडी सुपरहिट ठरली आणि त्याबरोबरच कमल हासन आणि रती अग्निहोत्रीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. गोव्याच्या सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी साकारलेली ही अजरामर कलाकृती आजही लोकांच्या भावविश्वात ठाण मांडून बसली आहे.

 

‘अँग्री यंग मॅन’च्या ऐन बहराच्या काळात हाणामारीच्या चित्रपटांचे पेव फुटलेले असतानाच कोवळ्या तरुणाईची एक हळवी प्रेमकथा तितकेच हळूवार संगीत घेऊन पडद्यावर आली आणि प्रेक्षकांना जणू काही वाळवंटात ‘ओअ‍ॅसिस’ दिसावे असा गारवा द़ृष्टीला आणि मनाला जाणवला! ‘कयामत से कयामत तक’ने लोकांच्या अनेक प्रचलित धारणा बदलल्या. कट्टर दुश्मनी असलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींनी प्रेमासाठी उचललेले धाडसी पाऊल पाहत असताना पुढे त्यांचे सर्व काही चांगलेच होईल असेच प्रेक्षकांना वाटत होते. मात्र, ‘हीरो’ सर्व काही करू शकतो असा समज असणार्‍या प्रेक्षकांना कोवळा तरुण असणारा हीरो मार खात असतानाही दिसला. (Romantic couples) पडद्यावर हीरोगिरी किंवा हीरोईनगिरी न दाखवता सर्वसामान्य तरुण-तरुणींची प्रेमाची स्थिती व वास्तविकता दाखवण्याचाच प्रयत्न करण्यात आला. हे सर्व समर्थपणे साकारले आमीर खान आणि जुही चावलाने. या शोकांतिकेने दोघांची जोडीही लोकांच्या मनात कायमची राहिली.

चेहर्‍यावरचा निरागसपणा अद्यापही न गमावलेले कोवळ्या वयातील तरुण-तरुणी, सुमधूर संगीत, प्रत्येक द़ृश्याला वेगळ्या उंचीवर नेणारे परिणामकारक पार्श्वसंगीत आणि या सर्वांचा सुंदर मेळ घालणारे दिग्दर्शन. ‘मैने प्यार किया’मध्ये ही सर्व भट्टी चांगली जमली आणि लोकांना एक सुंदर ‘प्रेम’पट पाहायला मिळाला. (Romantic couples) सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांची जोडी या चित्रपटाने अद्यापही लोकांच्या स्मरणात राहिली आहे. कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने मैत्रीतून फुलत जाणारी प्रेम आणि सुमनची ही कथा लोकांनी डोक्यावर घेतली. ‘मैने प्यार किया’ने जो इतिहास घडवला तो लोकांसमोर आहेच; पण आजही हा चित्रपट लोकांना आवडतो हे या चित्रपटाचे खरे यश आहे. सलमान आज बडा स्टार आहे, मात्र त्याच्या सर्वच भूमिकांमधून एकच निवडायची असेल तर अनेक जण यामधील ‘प्रेम’च निवडतील! भाग्यश्री तर आजही ‘मैने प्यार किया’मुळेच प्रसिद्ध आहे!

 

मुंबईच्या ‘मराठा मंदिर’ चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ (Romantic couples) चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला आणि पुढे तो सलग वीस वर्षे या चित्रपटगृहात ठाण मांडून बसला. युरोपच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या राज आणि सीमरनच्या प्रेमकथेचा पंजाबच्या मातीत गाठलेला उत्कर्ष पाहताना लोक भान विसरून जात. खर्‍या प्रेमाची ओढ, परीक्षा आणि मानसिक घुसमट या चित्रपटाने सुंदररीत्या दाखवली. खास सीमरनला शोधत लंडनहून आलेला राज आणि ‘मेरे ख्वाबों में जो आये’ म्हणत ज्या राजकुमाराची प्रतीक्षा केली तो साक्षात आलेला पाहून त्याच्यासाठी झुरणारी सीमरन लोकांना भावली. शाहरूख आणि काजोलने या दोन भूमिका आपल्या सुंदर अभिनयाने अजरामर करून ठेवलेल्या आहेत. ‘बाजीगर’मध्ये पहिल्यांदा एकत्र आलेली या दोन कलाकारांची जोडी ‘डीडीएलजे’पासूनच खर्‍या अर्थाने जमली व नंतर ती अनेक हिट चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.

Back to top button