देशी गायींच्या चार प्रजातींची जीनोम संरचना स्पष्ट | पुढारी

देशी गायींच्या चार प्रजातींची जीनोम संरचना स्पष्ट

भोपाळ : येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) च्या संशोधकांनी भारतीय गायींच्या चार देशी प्रजातींमधील ड्राफ्ट जीनोम स्पष्ट करण्यात यश मिळवले आहे. कासरगोड बुटकी, कासरगोड कपिला, वेचुर आणि ओंगोल या चार प्रजातींच्या देशी गायींची जीनोम संरचना त्यांनी उलगडली आहे. या संशोधनाच्या आधारे गायींचे प्रजनन आणि प्रबंधन यामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत होऊ शकते.

भारतातील देशी गायींमध्ये काही विशेष क्षमता असतात ज्या त्यांना कठीण परिस्थितीतही अनुकूलता स्थापन करण्यास मदत करतात. खराब गुणवत्तेचे भोजन पचवणे आणि आजारांबाबत प्रतिकारकशक्ती विकसित करणे, असे काही गुण देशी गायींमध्ये नैसर्गिकरीत्याच असतात. त्यांची ही खासियत व अन्य गायींच्या तुलनेतील त्यांच्यामधील फरक समजून घेण्यासाठी नवे संशोधन महत्त्वाचे आहे. भारतीय गायींच्या देशी प्रजातींचे जीनोम अनुक्रमित केल्याने त्यांच्या व अन्य प्रजातींमधील आनुवंशिक फरक समजून घेण्यास मदत मिळू शकेल.

यापूर्वीच्या काही संशोधनांमधून भारतीय गायींविषयी अनेक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उष्ण वातावरणात त्या आपला आकार आणि दुधाची गुणवत्ता कशी टिकवून ठेवतात, हे समजून घेण्याचाही प्रयत्न झाला आहे. मात्र, त्यावेळी भारतीय गायींचा संपूर्ण जीनोम माहिती नव्हता. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणती आनुवंशिक वैशिष्ट्ये असतात हे समजून घेणे कठीण होते. ‘आयआयएसईआर’, भोपाळच्या संशोधकांनी उच्च-थ्रुपूट अनुक्रमण तंत्राचा वापर करून त्यांचा जीनोम उलगडला आहे.

Back to top button