Agribot : विद्यार्थ्यांनी केला ‘अ‍ॅग्रीबोट’ बनवण्याचा विश्वविक्रम | पुढारी

Agribot : विद्यार्थ्यांनी केला ‘अ‍ॅग्रीबोट’ बनवण्याचा विश्वविक्रम

भोपाळ : येथील मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात शाळकरी विद्यार्थ्यांनी एक विश्वविक्रम केला. देशभरातील अनेक राज्यांमधील 1,600 शाळकरी विद्यार्थ्यांनी यावेळी रोबोटिक तंत्रज्ञानावर काम करीत कृषी कार्यांसाठी एकाचवेळी व एकाच ठिकाणी 1,484 रोबो बनवून विश्वविक्रम केला. या रोबोला ‘अ‍ॅग्रीबोट’ असे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेले गिनिज बुकचे प्रतिनिधी ऋषीनाथ यांनी हा विश्वविक्रम असल्याचे घोषित केले.

ऋषीनाथ यांनी सांगितले की, हा कार्यक्रम एक ‘बेंचमार्क’ ठरला आहे. यापूर्वी 11 ऑगस्ट 2019 मध्ये हाँगकाँगच्या रोबो इन्स्टिट्यूटमधील मुलांनी एकाचवेळी रोबो वॉक घडवला होता. आता हा विक्रम भोपाळमध्ये तोडून नवा विक्रम बनवण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री ओमप्रकाश सखलेचा यांनी याबाबत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे, या ‘अ‍ॅग्रीबोट’मध्ये ज्या वस्तू वापरण्यात आल्या आहेत त्या सर्व ‘मेड इन इंडिया’ आहेत.

यामधील कोणताही पार्ट अन्य देशांमधून आणलेला नाही. या उपक्रमात विद्यार्थ्यांना एक किट देण्यात आले होते. त्यामध्ये दोन चाके, एक मोटार, एक बॅटरी, तीन सीड बॉक्स, वॉटर टँक, कार्डबोर्ड यांचा समावेश होता. त्यापासून हा ‘अ‍ॅग्रीबोट’ तयार करण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला होता. तत्पूर्वी, ‘अ‍ॅग्रीबोट’बाबत सात मिनिटांचा एक व्हिडीओ मुलांना दाखवण्यात आला होता.

Back to top button