वर्धा : आतेभावानेच मामेभावावर झाडल्या गोळ्या; दत्तपूर येथील घटना | पुढारी

वर्धा : आतेभावानेच मामेभावावर झाडल्या गोळ्या; दत्तपूर येथील घटना

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : साखरेचे पोते पडले असल्याचे सांगून मदतीसाठी सोबत नेलेल्या मामेभावावर चुलत आतेभावाने गोळ्या झाडल्या. इर्षेतून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दत्तपूर शिवारात घडली. हर्षल झाडे असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

वर्ध्याच्या नालवाडी परिसरातील हर्षल झाडे याच्याकडे सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास रेहकी येथील राहुल हरिचंद्र वाघमारे हा आला. संशयित आरोपी राहुल वाघमारे याने हर्षल झाडे याला घराच्या बाहेर बोलवत गाडीवरील साखरेच्या गोण्या दत्तपूर टी पॉइंटजवळ रस्त्यावर पडल्या असून त्या गाडीवर ठेवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. हर्षल आतेभाऊ असलेल्या राहुलच्या मदतीसाठी गेला. लगेच गाडीवर बसून दोघे दत्तपूर नजीक बायपास रस्त्यावर आले. तेथे पिवशीतील पिस्तुल काढून राहुलने हर्षलवर गोळी झाडली. पहिली गोळी हर्षलच्या जांघेवर लागली. गोळी लागताच हर्षलने बचाव करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी राहुलने दुसरी गोळी झाडली. नशिब बलवत्तर म्हणून ही गोळी हुकली. जखमी अवस्थेत हर्षल धावत दत्तपूर येथील रस्त्यावर असलेल्या लॉनजवळ आला. तेथे समारंभ सुरू होते. अचानक जखमी अवस्थेत आलेल्या हर्षलने तेथून कुटुंबियांना कळविले. हर्षलला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इर्षेतून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास ठाणेदार विनीत घागे करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, ठाणेदार विनीत घागे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत पहाटे राहुल वाघमारे याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 

Back to top button