एक तास विजेशिवाय राहिल्यास म्हणे बक्षीस! | पुढारी

एक तास विजेशिवाय राहिल्यास म्हणे बक्षीस!

लंडन : विजेचा लपंडाव ही आपल्यासाठी काही नवलाईची बाब नाही. पाकिस्तानमध्ये तर विजेचे संकट मोठेच आहे. मात्र, विकसित राष्ट्रांमध्ये लोकांना विजेशिवाय राहण्याची सवय नसते. आता ब्रिटनच्या नॅशनल ग्रीडने वीज बचतीसाठी एक अनोखी योजना आखली आहे. या योजनेंतर्गत दिवसातला एक तास जरी ग्राहक विजेशिवाय राहू शकले, तर त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्यात येईल. नागरिकांना विजेचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्याचा वापर मर्यादित करण्यासाठी ब्रिटनमध्ये ही योजना तयार करण्यात आली आहे.

पाणी, इंधन, वीज या गोष्टींचा अमर्याद वापर रोखण्यासाठी सर्वच देशांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या लोकसंख्येसाठी पुरेल इतके पाणी, इंधन भविष्यात उपलब्ध होईल का याबाबत संशोधक साशंक आहेत. त्यामुळेच आहे तो साठा मर्यादित स्वरूपात आतापासून वापरला तर आपल्या पुढच्या पिढ्यांना सुखाने जगता येऊ शकेल. त्यासाठी अशा योजना आखाव्या लागतात.

ब्रिटनमध्ये या योजनेत सहभाग घेणार्‍या ग्राहकाने एक तास वीज बंद ठेवली, तर त्या बदल्यात त्या ग्राहकाला हजारो रुपये मिळू शकतात. डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिसच्या अंतर्गत ग्राहकांना ही सवलत दिली जाते आहे. ब्रिटनमध्ये राहणे सध्या खूप महाग झाले आहे. तिथेही महागाई वाढली असल्याने नॅशनल ग्रीड कंपनीने डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिसचा लाईव्ह इव्हेंट चालू केला आहे. देशातील नागरिकांना विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Back to top button