स्मार्ट वॉचने दिले महिलेला जीवदान | पुढारी

स्मार्ट वॉचने दिले महिलेला जीवदान

न्यूयॉर्क : स्मार्ट वॉच भारतासह जगभरात खूप लोकप्रिय आहे आणि त्यामागचे कारण केवळ डिझाईन आणि त्याचा प्रीमियमच नसून त्यात दिलेले हेल्थ आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स युजर्सना खूप आवडतात. त्याची आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इतकी जबरदस्त आहेत की अनेक प्रकरणांमध्ये केवळ त्यामुळेच लोकांचे प्राण वाचले आहेत. ही वैशिष्ट्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकरणांइतकीच अचूक आहेत. यामुळे शरीरातील अनेक बदलांचा सहज मागोवा घेता येतो आणि वेळेत मोठा निर्णय कमी कालावधीत घेता येतो. साहजिकच त्यामुळे जीवही वाचू शकतो.

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेसोबतही असेच घडले. संबंधित महिला आणि तिच्या मुलासाठी हे स्मार्ट वॉच देवदूत ठरले आहे. जेसी केली असे या महिलेचे नाव. एक दिवस अचानक या महिलेच्या हृदयाच्या गतीमध्ये वेगळेपणा आढळून आला. त्यानंतर स्मार्ट वॉचने तिला याबाबत अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली. काही काळ तिने या इशार्‍याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा हा प्रकार स्मार्ट वॉचमधून तिला वारंवार इशारे पाठवण्यात आले, तेव्हा ती गडबडली. तिने तातडीने रुग्णालय गाठले आणि तिथे पोहोचल्यावर तिला धक्काच बसला. खरे तर, स्मार्ट वॉचकडून तिला तिच्या हृदयगतीत झालेल्या बिघाडाबद्दल सतत सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार तिच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 120 बीट्स पेक्षा जास्त होते.

महिलेची प्रसूती अगदी जवळ आल्याची आणि गर्भावस्थेत काहीतरी समस्या येत असल्याची माहिती रुग्णालयामध्ये मिळाली होती. एवढेच नव्हे तर तिचा रक्तदाब कमी होत होता आणि त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाली होती. स्मार्ट वॉचने या महिलेला योग्य वेळी अलर्ट पाठवून दिलेल्या माहितीमुळे ही महिला आता सुरक्षित असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळाचे नामकरण मेरी असे करण्यात आले आहे.

Back to top button