Horseshoe : घोड्याच्या पायात नाल का ठोकतात? | पुढारी

Horseshoe : घोड्याच्या पायात नाल का ठोकतात?

वॉशिंग्टन : हजारो वर्षांपासून घोडा हा प्राणी माणसाचा निष्ठावंत सोबती बनलेला आहे. प्रवास, मालवाहतूक, युद्ध, शेती अशा अनेक कारणांसाठी घोड्यांचा वापर केला जात असतो. या शक्तिशाली आणि वेगवान प्राण्याची काळजीही अनेकप्रकारे घेतली जात असते. त्यामध्येच घोड्याच्या पायावर म्हणजेच खुरांवर दर चार ते सहा आठवड्यांनी नवी नाल (Horseshoe) ठोकली जाते. त्याचे काय कारण आहे हे माहिती आहे का?

केंचुकी विद्यापीठातील पशुतज्ज्ञ डॉ. फर्नांडो कॅमर्गो यांनी सांगितले की सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीपासून घोड्यांना पाळले जाऊ लागले. त्या दरम्यानच कधी तरी घोड्यांच्या पायांना नाल ठोकण्याचीही सुरुवात झाली असावी. सुरुवातीला अशा नाला या धातूच्या नव्हे तर कातडी किंवा वनस्पतीजन्य सामग्रीच्या होत्या. इसवी सन 500 च्या काळापासून घोड्यांना धातूची नाल (Horseshoe) ठोकली जाऊ लागली. पुढील पाचशे वर्षांच्या काळात ही सर्व ठिकाणी एक सामान्य बाब बनली.

सध्याही अ‍ॅल्युमिनियम किंवा पोलादाची नाल ठोकली जात असते. काही लोक रबर, रेझिन आणि प्लास्टिकचाही यासाठी वापर करतात. घोडा हा एक वेगाने धावणारा प्राणी असला तरी त्याचे पाय नाजूकही असतात. त्यामुळे त्याच्या पायांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. नालेमुळे (Horseshoe) त्याच्या तळपायातील, टाचेतील अनेक नाजूक भागांना संरक्षण मिळत असते. त्याच्या तळपायावरील बाहेरचा भाग हा शिंगासारख्या सामग्रीचा बनलेला असतो. तो सातत्याने वाढत असतो आणि वेळोवेळी त्याला कापणे गरजेचे असते.

आपली नखे जशी वाढत असतात आणि आपण ती कापत असतो तसाच हा प्रकार असतो. नालेमुळे (Horseshoe) त्याच्या खुरांचा हा बाहेरचा भाग योग्य आकारात राहतो. वाळू किंवा खडकाळ भागावरून धावत असताना घोड्यांच्या खुरांचा हा भाग निघून जाऊ शकतो व आतील संवेदनशील भाग उघडा पडू शकतो. त्यामुळे घोड्याला वेदना होतात आणि तो चालू शकत नाही. नालेमुळे घोड्याच्या खुरांना संरक्षण मिळून हा आतील भागही त्यामुळे सुरक्षित राहतो.

हेही वाचा : 

Back to top button