US Shooting : गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली; कॅलिफोर्निया-आयोवा येथील गोळीबारात २ विद्यार्थ्यांसह ९ ठार | पुढारी

US Shooting : गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली; कॅलिफोर्निया-आयोवा येथील गोळीबारात २ विद्यार्थ्यांसह ९ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत दोन दिवसांत झालेल्या गोळीबाराच्या तीन घटनांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियातील हाफ मून बे येथे आज (दि.२४) झालेल्या दोन गोळीबाराच्या घटनांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. तर सोमवारी (दि. २४) आयोवा येथील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

कॅलिफोर्नियामध्ये हाफ मून बे येथील गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे, असे वृत्त अमेरिकन मीडियाने दिले आहे. दरम्यान, “संशयित कोठडीत असून नागरिकांना कोणताही धोका नाही”, असे सॅन माटेओ काउंटी शेरीफ यांनी ट्वीट केले आहे.

आयोवातील डेस मोइनेस येथील शाळेत गोळीबार

अमेरिकेतील शाळेत गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे. आयोवा राज्यातील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात २ विद्यार्थी ठार, तर एक शिक्षक जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि.२३) घडली. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत एका शिक्षकालाही गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे डेस मोइनेस पोलिस विभागाचे प्रवक्ते पॉल पारिजेक यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिकाऱ्यांनी अद्याप गोळी झाडणाऱ्या आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.

Back to top button