हस्तांदोलन, खुर्चीमुळेही का लागतो करंट? | पुढारी

हस्तांदोलन, खुर्चीमुळेही का लागतो करंट?

नवी दिल्ली : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हवा कोरडी व थंड असते. अशा काळात कधी कधी हस्तांदोलन, टेबल-खुर्ची, स्वेटर, कंगवा अशा वस्तूंमुळेही आपल्याला काही क्षणासाठी करंट लागल्याचा अनुभव येत असतो. असा क्षणिक विजेचा धक्का का बसतो याचे कुतुहल अनेकांना असू शकते.

या सर्व वस्तू अणूंनी बनल्याचे आपल्याला माहिती आहेच. अणू 3 कणांनी बनतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्युट्रॉन. यापैकी इलेक्ट्रॉनच्या संचारालाच ‘करंट’ म्हणतात. इलेक्ट्रॉनमध्ये निगेटिव्ह (ऋण) भार असतो, प्रोटॉनमध्ये पॉझिटिव्ह (धन) भार असतो व न्युट्रॉन हा भाररहित असतो.‘करंट’चा अर्थ आहे प्रवाह. जेव्हा विद्युत तारांमधून इलेक्ट्रॉनचे वहन होते तेव्हा त्याला ‘इलेक्ट्रिक करंट’ किंवा ‘विद्युत प्रवाह’ म्हणतात. यासाठी माध्यमाची गरज असते.

माध्यमे ही दोन प्रकारची असतात…‘गुड कंडक्टर’ आणि ‘बॅड कंडक्टर’. ‘गुड कंडक्टर’मधून विद्युत प्रवाहाचे सहज वहन होते. उदा. धातू ‘बॅड कंडक्टर’ मधून विद्युत प्रवाहाचे सहज वहन होत नाही. उदा. लाकूड, रबर. मात्र, ‘बॅड कंडक्टर’नेही बनलेल्या वस्तूंना स्पर्श झाल्यास काही वेळा त्यावरील स्थिर विद्युतमुळे करंट जाणवतो.

‘बॅड कंडक्टर’मध्येही कधी-कधी निगेटिव्ह भार म्हणजेच इलेक्ट्रॉन येतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही अशा वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करता, तेव्हा तो भार लगेच तुमच्यातून वहन होऊन निघून जातो आणि तुम्हाला काही क्षणांसाठी झटका लागतो. स्थिर करंट म्हणजेच निश्चित भार (फिक्स्ड चार्ज), जो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकत नाही.

Back to top button